जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील धावपट्टी कार्यान्वित होणार

श्रीनगर – जम्मू-काश्मीर प्रशासन आणि लष्करामध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पार पडला. केंद्र सरकारच्या ‘उडाण’ योजनेअंतर्गत जम्मू-काश्मीरच्या ‘किश्तवार’मधील ‘एअरस्ट्रीप’ अर्थात धावपट्टी कार्यान्वित करण्यात येणार आहे. किश्तवार जिल्हा लडाख, हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ असल्याने सामरिकदृष्टया याचे महत्त्व वाढले आहे. तसेच लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव पेटलेला असताना किश्तवारची एअरस्ट्रीप कार्यान्वित होणे अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील धावपट्टी कार्यान्वित होणारसोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि लष्कराच्या नॉर्दन कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी व ‘१६ कॉर्प्स’चे अधिकारी लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या करारानुसार किश्तवार एअरस्ट्रीपची डागडूजी करुन ती कार्यान्वित करण्यात येईल. किश्तवार जम्मू विमानतळापासून २१० किलोमीटर अंतरावर आहे. २०१८ सालापासून किश्तवारच्या एअरस्ट्रीपचा विकास रखडला होता. याचा विकास झाल्यावर लष्करासह याचा फायदा किश्तवारच्या स्थानिकांना देखील मिळणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील धावपट्टी कार्यान्वित होणारकडाक्याच्या थंडीत जम्मू आणि काश्मीरमधल्या अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटतो. अशा काळात ही एअरस्ट्रीप लष्कराच्या जवानांना आणि स्थानिकांना उपयुक्त ठरेल. किश्तवारमध्ये कोणी गंभीर आजारी असल्यास उपचारांसाठी त्यांना जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागते. त्यासाठी आठ तास लागतात. पण किश्तवारची एअरस्ट्रीप विकसित झाल्यावर अर्ध्या तासात जम्मूला पोहोचता येईल, असे मनोज सिन्हा म्हणाले. यामुळे किश्तवारचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल, असेही सिन्हा पुढे म्हणाले.

दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किश्तवारमध्ये ‘अपाचे’ या लढाऊ हेलिकॉप्टर्सनी घिरट्या घातल्या होत्या. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरु असताना किश्तवारमधल्या लष्करी हालचाली स्थानिकांना धडकी भरविणार्‍या होत्या. पण हा सरावाचच भाग असल्याचे कळल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किश्तवारमध्ये दोन ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स उतरल्याचे देखील वृत्त प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वी लष्कराने किश्तवारच्या धावपट्टीची पाहणी केली होती.

leave a reply