अमेरिका-युरोपला अंतराळक्षेत्रात सहकार्य नाकारून रशियाचे निर्बंधांना प्रत्युत्तर

अंतराळक्षेत्रात सहकार्यमॉस्को/वॉशिंग्टन/लंडन – रशिया-युक्रेन युद्धावरून पाश्‍चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना रशियानेही प्रत्युत्तर दिले. अंतराळक्षेत्रातील आघाडीच्या देशांपैकी एक असणार्‍या रशियाने अमेरिका तसेच ब्रिटनला या क्षेत्रातील तंत्रज्ञान तसेच सुविधा न पुरविण्याचा निर्णय घेतला. यापुढे अमेरिका त्यांच्या ‘झाडूवर’ बसून अवकाशात जाईल, असा टोला रशियन अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी यावेळी लगावला. यापूर्वीही रोगोझिन यांनी आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या(आयएसएस) मुद्यावरून अमेरिकेला फटकारले होते.

रशियाने १० दिवसांपूर्वी युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. निर्बंध जाहीर करताना रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याबरोबरच रशियाची अंतराळ क्षेत्रातील क्षमता संपविण्याचेही प्रयत्न केले जातील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले होते. त्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

‘आयएसएसबाबत अमेरिका रशियाला सहकार्य करणार नसेल तर मग अंतराळातील निकामी उपग्रहांच्या कचर्‍यापासून आयएसएसची सुरक्षा कोण करणार? या अपघातामुळे आयएसएस पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. पण आयएसएस रशियावर आदळू शकत नाही, ते अमेरिकेवर किंवा युरोपवर आदळले तर काय कराल? त्याला तोंड देण्याची अमेरिकेने तयारी केली आहे का’, असे प्रश्‍न रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी विचारले होते.

अंतराळक्षेत्रात सहकार्यत्यापाठोपाठ आता रशियाने अमेरिकेच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणार्‍या ‘आरडी-१८०’ या इंजिन्सचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी अंतराळसंस्था नासाकडून पाठविण्यात येणार्‍या रॉकेट प्रक्षेपकांमधील पहिल्या टप्प्यात या इंजिन्सचा वापर होतो. आतापर्यंत रशियाने अमेरिकी संस्थेला अशी १२२ इंजिन्स पुरविली असून त्यातील ९८ इंजिन्स अमेरिकेकडून वापरण्यात आली आहेत. रशियाने अमेरिकेच्या इंजिन्सवर लादलेल्या निर्बंधांवरून रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी टोला लगावला आहे. ‘पाश्‍चिमात्य देशांकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही अमेरिकेला आमची बेस्ट इंजिन्स पुरवू शकत नाही. अवकाशात जायचे असेल तर अमेरिका यापुढे झाडूवर बसूनच जाईल. आम्ही त्याबाबत काही करु शकत नाही’, असे रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी बजावले. अमेरिकेपाठोपाठ रशियाने जर्मनी, ब्रिटन तसेच युरोपिय महासंघाबरोबरील अंतराळ सहकार्यावरही निर्बंध लादले आहेत.

जर्मनीबरोबरील संयुक्त अंतराळ प्रकल्पातून रशियाने माघार घेतली आहे. तर ब्रिटनच्या ‘वनवेब’ कंपनीचे उपग्रह यापुढे प्रक्षेपित केले जाणार नाहीत, असेही रशियाने जाहीर केले. रशियाने युरोपियन स्पेस एजन्सीबरोबरील करारही रद्द करण्याची घोषणा केली आहे.

leave a reply