सर्बियाला युरोपिय महासंघ किंवा रशियापैकी एकाची निवड करावी लागेल

- महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार विभागप्रमुखांचा इशारा

एकाची निवडब्रुसेल्स/मॉस्को – रशियाबरोबर जवळिकीचे संबंध ठेवल्यास सर्बियाला युरोपिय महासंघाचा सदस्य होता येणार नाही. त्यामुळे सर्बियाने युरोपिय महासंघ किंवा रशियापैकी एकाची निवड करावी, असा इशारा महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख जोसेप बॉरेल यांनी दिला. सोमवारी ब्रुसेल्समध्ये अल्बेनिया व सर्बियासह पाच देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात बोरेल यांनी सर्बियाला लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वीच सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांनी ‘कलर रिव्होल्युशन’ घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असा घणाघाती आरोप केला होता.

युगोस्लाव्हिया या देशाचे विघटन होऊन निर्माणा झालेल्या देशांमध्ये सर्बिया, माँटेनेग्रो, बोस्निया-हर्झ्ोगोविना, नॉर्थ मॅसिडोनिया व कोसोवोचा समावेश होतो. कोसोवो या सर्बियातून फुटून निघालेला प्रांत असून आंतरराष्ट्रीय समुदायातील सर्व देशांनी कोसोवोला स्वतंत्र मान्यता दिलेली नाही. या मुद्यावरून अमेरिकेसह पाश्चिमात्य देश सर्बियावर सातत्याने दडपण आणत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दबाव अधिकच वाढविण्यात येत असून सर्बियात आंदोलनही सुरू झाले आहे.

एकाची निवडमे महिन्याच्या सुरुवातीला सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये घडलेल्या मास शूटिंगच्या घटनांमध्ये सुमारे २० जणांचा बळी गेला होता. या घटना सरकारचे अपयश असल्याचा आरोप करून विरोधक व स्वयंसेवी गटांनी देशात आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात राजधानी बेलग्रेडमध्ये निघालेल्या मोर्च्यात १० हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. पुढील काळातही असे मोर्चे काढण्याचा इशारा विरोधी गटांकडून देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघाकडून सर्बियन सरकारला धमकाविण्याचा प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरतो. बोरेल यांनी, युरोपातील काही देशांमध्ये रशियाचा प्रभाव वाढत असल्याचा उल्लेख केला. त्याचवेळी सर्बिया रशियाविरोधात युरोपिय महासंघाकडून सुरू असलेल्या कारवाईला समर्थन देत नसल्याची जाणीवही करून दिली. या धोरणामुळे सर्बिया युरोपिय महासंघाचा सदस्य होऊ शकणार नाही, याकडे बोरेल यांनी लक्ष वेधले.

leave a reply