मॉस्को/किव्ह – ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’ अंतर्गत ‘ब्लॅक सी’ क्षेत्रातून अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची हमी रशिया देणार नाही, असा खरमरीत इशारा रशियाने दिला. सुरक्षा परिषदेत पार पडलेल्या बैठकीत रशियाचे राजदूत व्हॅसिली नेबेंझिआ यांनी, अन्नधान्यासाठी तयार करण्यात आलेल्या कॉरिडॉरचा वापर युक्रेन लष्करी व घातपाती कारवायांसाठी करत असल्याचा आरोपही केला. पुढील काळात पुन्हा करार होण्याची शक्यता असल्यास त्यासाठी वेगळ्या अटी लागू होतील, असेही रशियाने बजावले आहे. युक्रेनने क्रिमिआतील रशियन नौदलाच्या तळावर चढविलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’मधून बाहेर पडत असल्याचे रशियाने जाहीर केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही याला दुजोरा दिला आहे.
युक्रेनने शनिवारी पहाटेच्या सुमारास क्रिमिआतील रशियन नौदलाचा तळ असणाऱ्या सेव्हॅस्टोपोल बंदरावर ड्रोन हल्ले चढविले. या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या एका युद्धनौकेसह काही जहाजांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ही युद्धनौका व इतर जहाजे ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’चा भाग होती, असे रशियाने स्पष्ट केले. युक्रेनने त्यावर केलेला हल्ला हा दहशतवादी कारवाई असून त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या करारातून बाहेर पडत असल्याचे रशियाने जाहीर केले. याच मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेची बैठकही आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत रशियाच्या राजदूतांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘ब्लॅक सी सागरी क्षेत्र हा तणावपूर्ण व संघर्षग्रस्त भाग आहे. रशियाच्या तपासणीशिवाय या भागातून जहाजांची वाहतूक करण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. पुढील काळात या क्षेत्रातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रशिया स्वतंत्र उपाययोजना हाती घेईल. रशियाच्या सहभागाशिवाय घेण्यात येणाऱ्या निर्णयांचे पालन करण्यास रशिया बांधील राहणार नाही’, असे नेबेंझिआ यांनी बजावले. यावेळी त्यांनी युक्रेन अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी उभारलेल्या मानवतावादी कॉरिडॉरचा वापर लष्करी तसेच घातपाती कारवायांसाठी करीत असल्याचा आरोपही केला. पुढील काळात अन्नधान्याच्या वाहतुकीसाठी करार झाल्यास त्यासाठी अटी वेगळ्या असतील, असेही रशियाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सोमवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाने मंगळवारी पुन्हा एकदा युक्रेनमध्ये जबरदस्त हल्ले केल्याचे समोर आले. डोन्बास क्षेत्रातील सोलेदार, वुहलेदर, बाखमत तसेच डोनेत्स्क शहरानजिक रशियाने तोफा, रणगाडे व रॉकेट्सचा जोरदार मारा केला. सोमवारी रात्रीपासूनच रशियाने हल्ल्यांना सुरुवात केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. युक्रेनने ताबा मिळविलेल्या खार्किव्ह प्रांतातील अनेक भागांमध्ये हल्ले चढविण्यात आल्याचेही समोर आले. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्हमध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहितीही युक्रेनच्या लष्कराने दिली.
युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांचे केंद्र असलेल्या खेर्सनमध्ये युक्रेन व रशियाच्या फौजांमध्ये जबर संघर्ष पेटल्याची माहिती सूत्रांनी दिली. रशियाने या भागातील बहुतांश नागरिकांचे स्थलांतर केले असून युक्रेनी हल्ले रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. रशियन फौजा या भागातून युक्रेनला माघारी लोटू शकतात, असे दावे विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत.