पॅट्रियॉट क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यात कपात करून बायडेन प्रशासन सौदीला सजा देणार

अमेरिकी वृत्तवाहिनीचा दावा

us-soldiers-patriot-missileवॉशिंग्टन – ‘ओपेक’ने इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेले बायडेन प्रशासन सौदी अरेबियाला शिक्षा करू शकते. सौदीतील इंधन प्रकल्प व महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली ‘पॅट्रियॉट’ ही हवाई सुरक्षा यंत्रणेच्या पुरवठ्यात कपात करण्यावर बायडेन प्रशासन गांभीर्याने विचार करीत असल्याचा दावा, अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला. मध्यावधी निवडणुकीनंतर बायडेन प्रशासन यावर निर्णय घेईल. असे झाले तर सौदीचे इंधन प्रकल्प व इतर ठिकाणांना हौथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्र व ड्रोन्सपासून असलेला धोका अधिकच वाढेल, असा इशारा अमेरिकेतील काही नेते व लष्करी विश्लेषक देत आहेत.

सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या ३०० पॅट्रियॉट १०४-ई इंटरसेप्टर्सच्या खरेदीसंदर्भात करार केला आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांपासून सौदीतील इंधन प्रकल्प व तळ सुरक्षित रहावे, यासाठी अमेरिका व सौदीमध्ये सदर व्यवहार झाले होते. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याविरोधातही पॅट्रियॉट यंत्रणा सौदीची सुरक्षा करील, अशी अमेरिकेची आजवरची भूमिका होती. गेल्या वर्षी बायडेन प्रशासनाने या यंत्रणेसाठी आवश्यक इंटरसेप्टर्स पुरविण्यास टाळाटाळ केल्यानंतर हौथींनी सौदीची राजधानी रियाध तसेच महत्त्वाच्या इंधन प्रकल्पांवर ड्रोन्सचे हल्ले चढविले होते.

aramcoराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या या भूमिकेमुळे अमेरिका सौदी व आखातातील इतर मित्रदेश गमावून बसेल, अशी देशांतर्गत टीका वाढू लागली. त्यानंतर बायडेन यांनी सौदीसाठीचा इंटरसेप्टर्सचा पुरवठा सुरू केला होता. पण महिन्याभरापूर्वी ‘ओपेक’च्या बैठकीत सदस्य देशांनी इंधनाच्या उत्पादनात प्रतिदिन २० लाख बॅरल्स इंधनाची कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बायडेन प्रशासनाने सौदीच्या लष्करी सहाय्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. दोन अमेरिकी अधिकारी व सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकी वृत्तवाहिनी ‘एनबीसी’ने ही बातमी प्रसिद्ध केली.

येत्या काही दिवसात अमेरिकेत पार पडणाऱ्या मध्यावधी निवडणुकीनंतर बायडेन प्रशासन याबाबतचा निर्णय जाहीर करू शकेल. पेंटॅगॉनमधील काही लष्करी अधिकारी सौदीविरोधातील या कारवाईला पाठिंबा देत आहेत. डिसेंबर महिन्यात ओपेक देशांची बैठक पार पडेल व या बैठकीत सौदी, रशिया व इतर देशांनी इंधन कपातीचे धोरण कायम ठेवले तर सौदीवरील कारवाई टाळता येऊ शकत नाही, असा इशारा पेंटॅगॉनचे लष्करी अधिकारी देत आहेत.

मात्र पेंटॅगॉनमधील इतर लष्करी अधिकारी याला विरोध करीत आहेत. असे केल्यास सौदीच्या नागरिकांबरोबरच या देशात तैनात असलेल्या अमेरिकी जवानांची सुरक्षा देखील धोक्यात येईल, ही बाब सदर लष्करी अधिकारी लक्षात आणून देत आहेत. तसेच क्षेत्रीय सुरक्षा आणि आखाती देशांबरोबरचे संबंध देखील यामुळे धोक्यात येऊ शकतात, याची जाणीव देखील पेंटॅगॉनच्या या अधिकाऱ्यांनी करून दिली. इतकेच नाही तर सौदी व इतर आखाती देशांविरोधातील अमेरिकेच्या या कारवाईचा लाभ रशिया व चीनला मिळेल, असा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीतआहेत.

leave a reply