युक्रेनमधील हल्ल्यात 200 हून अधिक परदेशी जवान मारल्याचा रशियाचा दावा

attack-Ukraineमॉस्को – दक्षिण युक्रेनच्या मायकोलेव्ह भागात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये 200 हून अधिक कंत्राटी परदेशी जवान मारल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. मायकोलेव्ह शहरानजिक कंत्राटी जवानांसाठी तात्पुरता तळ उभारण्यात आला होता. या तळावर रशियाच्या ‘एरोस्पेस फोर्सेस’ने ‘हाय प्रिसिजन वेपन्स’च्या सहाय्याने हल्ला चढविला. यात युक्रेनच्या ‘फॉरेन लिजन’चा भाग असलेले सुमारे अडीचशे जवान मारले गेले, असे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. याबरोबरच उत्तर युक्रेनमधील खार्किव्हमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे 500 जवान मारले गेल्याची माहिती रशियाने दिली.

गेल्या महिन्यात पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतावर ताबा मिळविल्यानंतर रशियाने डोनेत्स्कसह उत्तर तसेच दक्षिण युक्रेनमधील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाकडील अत्याधुनिक क्षेपणास्त्रे व प्रगत शस्त्रे संपत आल्याचे दावे पाश्चिमात्य यंत्रणा तसेच माध्यमांनी केले होते. मात्र प्रत्यक्षात रशियाने ‘हाय प्रिसिजन वेपन्स’चे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे गेल्या काही आठवड्यांमधील हल्ल्यांवरून समोर येत आहे. सोमवारी तसेच मंगळवारी दक्षिण तसेच युक्रेनमध्ये केलेले हल्ले त्याला दुजोरा देणारे ठरतात.

दरम्यान, रशियाच्या पूर्व युक्रेनमधील हल्ल्यांनी युक्रेनी फौजा जेरीस आल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या वक्तव्यातून समोर आले. ‘पाश्चिमात्य देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे मिळत आहेत. मात्र तरीही रशियाचे प्रचंड मनुष्यबळ व लष्कराकडून अविरत होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनी जवान प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. पेस्की, ॲव्हडिव्हका व इतर बाजूंनी होणारे हल्ले म्हणजे युक्र्रेनी फौजांसाठी नरकमय स्थिती आहे. त्याचे वर्णन शब्दात केले जाऊ शकत नाही’ असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले.

पाश्चिनात्यांच्या चिथावणीमुळे युक्रेनमध्ये अणुयुद्धाचा भडका उडेल – रशियाचा इशारा

attack-in-Ukraineमॉस्को – युक्रेन संघर्षात अण्वस्त्रांचा वापर करण्याचा रशियाचा इरादा नाही. पण नाटो देशांकडून सुरू असलेल्या आक्रमक हालचाली व चिथावणीला प्रत्युत्तर म्हणून रशिया अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे रशियन अधिकारी अलेक्झांडर ट्रॉफिमोव्ह यांनी बजावले. संयुक्त राष्ट्रसंघटनेत सुरू असलेल्या बैठकीत हा दावा करतानाच ट्रॉफिमोव्ह यांनी अणुहल्ल्याच्या मुद्यावर रशियावर होत असलेले आरोपही फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, युक्रेनमधील झॅपोरिझिआमध्ये असलेला अणुप्रकल्प नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने केला आहे. रशिया तसेच युक्रेनने या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आयोगाच्या तज्ज्ञांना परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाकडून करण्यात आली आहे.

leave a reply