वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह रशियाची मध्यवर्ती बँक तसेच इतर क्षेत्रांवर लादलेल्या कठोर निर्बंधांचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. रशियाच्या बँकिंग क्षेत्रावर लादलेल्या निर्बंधांनंतर अवघ्या २४ तासात रशियन अर्थव्यवस्था तसेच चलन रुबलमध्ये विक्रमी घसरणीची नोंद झाली आहे. रशियन जनतेने बँकेतून पैसे काढून घेण्यासाठी ‘एटीएम’बाहेर रांगा लावल्याचे फोटोग्राफ्स माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहेत. रशियन जनतेत घबराहट निर्माण होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँकेने व्याजदरात मोठी वाढ केली असून परदेशी चलनाची विक्री सुरू केली आहे.
शनिवारी अमेरिकेसह युरोपिय मित्रदेशांनी ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय यंत्रणेतून निवडक रशियन बँकांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ अमेरिका तसेच ब्रिटनने रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून निधी उभारण्यासाठी करण्यात येणार्या व्यवहारांवर बंदी घालण्याचेही संकेत दिले होते. रशियातील ऊर्जा, तंत्रज्ञान व वित्त क्षेत्रातील अनेक कंपन्यांवर यापूर्वीच निर्बंध लादण्यात आले आहेत. एकापाठोपाठ टाकलेल्या या निर्बंधांचे पडसाद रशियन अर्थव्यवस्थेत उमटण्यास सुरुवात झाली आहे.
निर्बंधांची व्याप्ती समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर एका रात्रीत रशियाची अर्थव्यवस्था तब्बल ३० टक्क्यांनी घसरली आहे. या घसरणीनंतर रशियन अर्थव्यवस्था नीचांकी पातळीवर पोहोचल्याचे दावे करण्यात येत आहेत. रशियाचे चलन असणार्या रुबलची अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण झाली आहे. २४ तासांमध्ये रुबलचे मूल्य ४० टक्क्यांनी घसरले आहे. गेल्या आठवड्यात एका डॉलरसाठी ८० ते ९० रुबल मोजावे लागत होते. सोमवारी एका अमेरिकी डॉलरचे मूल्य तब्बल ११७ रुबलपर्यंत गेले आहे.
रुबलची ही घसरण रोखण्यासाठी रशियाच्या मध्यवर्ती बँकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. रशियातील व्याजदर ९.५ टक्क्यांवरून थेट २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. मध्यवर्ती बँकेने आपल्याकडील परकीय चलनाची विक्री सुरू केली आहे. त्याचवेळी आघाडीच्या उद्योगांना त्यांच्याकडील परकीय चलनाचा ८० टक्के हिस्सा विकण्याचे निर्देश दिले आहेत. दुसर्या बाजूला रशियन नागरिकांनी डॉलर्स तसेच रुबल्स काढून घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. राजधानी मॉस्कोसह इतर अनेक शहरांमधील बँका तसेच एटीएम्सच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
पाश्चिमात्य देशांकडून रशियावर अधिक कठोर निर्बंधांचे संकेतही देण्यात आले आहेत. मात्र रशियाने त्यासाठी तयारी केल्याकडे विश्लेषक लक्ष वेधीत आहेत. सोन्याचे राखीव साठे, डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांचा वाढलेला वापर, बँकेच्या व्यवहारांसाठी स्वतंत्र रशियन यंत्रणा तसेच चीन व इतर देशांबरोबरील वाढते सहकार्य या माध्यमातून रशिया पाश्चात्यांच्या निर्बंधांना तोंड देईल, असा दावा अर्थतज्ज्ञ करीत आहेत.