युक्रेनची भारतीय विद्यार्थ्यांवर सूडबुद्धीने कारवाई

- युक्रेनच्या राजदूतांनी कारवाईचे समर्थन केले

भारतीय विद्यार्थ्यांवरनवी दिल्ली/किव्ह – रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी हा देश सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडच्या सीमेजवळ युक्रेनी जवानांनी मारहाण करून त्यांचा छळ केल्याच्या धक्कादायक बातम्या समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रशियावर दबाव टाकून भारताने युक्रेनवरील हल्ला थांबवावा, अशी याचना करणार्‍या देशाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही वागणूक प्रक्षोभक ठरते. या कारवाईचे युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी केलेले समर्थन भारतीयांच्या संतापात अधिकच भर घालत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने रशियाविरोधी मतदान करण्याचे नाकारून आपला तटस्थपणा कायम ठेवला होता. त्यावर युक्रेनकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसते. युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी वैद्यकीय तसेच इतर प्रशिक्षण घेत होते. यापैकी जवळपास आठ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. पण अजूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यातील काहीजणांना पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया, हंगेरी या देशांमध्ये पाठवून त्यानंतर त्यांना भारतात आणले जात आहे. युक्रेन सोडण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सूडबुद्धीचा फटका बसला.

या विद्यार्थ्यांना रांगेत बराच काळ प्रतिक्षा करण्यास भाग पाडण्यात आले. या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाचे कर्मचारी अन्नपाणी व निवारा पुरवित होते. पण युक्रेनचे जवान या विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून ही मदत स्वीकारण्याची परवानगी देत नव्हते. इतकेच नाही तर यावर जाब विचारणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या जवानांनी लाथाबुक्यांनी तुडविले. काहीजणांना तर सळ्यांनी मारहाण केली. भारतीय विद्यार्थ्यांनीच ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविली. यानंतर भारतीयांमध्ये युक्रेनच्या विरोधात संतापाची भावना दाटली आहे.

काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या देशाला रशियाच्या आक्रमणापासून वाचविण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. रशियावर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. याचा वापर करून भारताने युक्रेनला वाचवावे, असे युक्रेनी राजदूतांचे म्हणणे होते. पण आता भारतीय विद्यार्थ्यांना झालेली मारहाण व त्यांचा छळ याची दखल घेण्याचे युक्रेनच्या राजदूतांनी टाळले आहे. इतकेच नाही तर नियम मोडणार्‍यांवर कारवाई झाली आहे, असे सांगून भारतीय माध्यमांनी याला अवास्तव महत्त्व देऊ नये, असे या राजदूतांनी म्हटले आहे.

सूडबुद्धीने भारतीय विद्यार्थ्यांवर केलेली ही कारवाई आणि त्याचे समर्थन यामुळे युक्रेनचा खरा चेहरा समोर आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देणारा हा देश व्यावसायिक पातळीवरील बांधिलकी मानण्यास देखील तयार नाही. दुसर्‍या देशातून आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणे ही युक्रेनची जबाबदारी ठरते. युद्धाच्या काळातही युक्रेन ही जबाबदारी टाळू शकत नाही. पण हा देश भारतीय विद्यार्थ्यांना पुरेसे सहाय्य करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करून सूड घेण्यात धन्यता मानत आहे, ही बाब युक्रेनचा खरा चेहरा जगासमोर आणणारी ठरते.

१९९८ साली भारताने केलेल्या अणुचाचण्यांना संयुक्त राष्ट्रसंघात विरोध करणार्‍या देशांमध्ये युक्रेन आघाडीवर होता. याआधी युक्रेनने पाकिस्तानला लष्करी सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेऊन भारताविरोधात भूमिका स्वीकारली होती. काश्मीरच्या प्रश्‍नावरही युक्रेनने भारतविरोधी भूमिका घेतली होती. भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईमुळे या सार्‍या गोष्टींची उजळणी होत आहे.

leave a reply