रशियन न्यायालयाने गुगल व फेसबुकला चार लाख डॉलर्सहून अधिक दंड ठोठावला

मॉस्को – रशियन न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या म्हणून ओळखण्यात येणार्‍या गुगल व फेसबुकला दंड ठोठावला आहे. रशियन सरकारने सांगितलेला बेकायदा मजकूर हटविण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी सोशल मीडिया अ‍ॅप ‘ट्विटर’ तसेच चिनी कंपनी ‘टिकटॉक’विरोधातही अशाच स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती.

गुगल व फेसबुकरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही वर्षांपूर्वी स्वतंत्र रशियन इंटरनेट उभारण्याची घोषणा केली होती. अमेरिका व युरोपकडून इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा रशियन राजवटीविरोधात होणारा वापर लक्षात घेऊन ही महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भातील कायद्यालाही मंजुरी देण्यात आली होती. गेल्या वर्षी तसेच या वर्षाच्या सुरुवातीला रशियाने ‘सॉव्हरिन रशियन इंटरनेट’च्या यशस्वी चाचण्या घेतल्याचीही माहिती दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही महिन्यात रशियाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांविरोधात सुरू केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते. सोमवारी रशियन यंत्रणा ‘रॉसकॉम्नादझॉर’ने गुगलला 24 तासांची नोटीस दिली होती. अंमली पदार्थ, हिंसाचार व कट्टरतावाद यासंदर्भातील व्हिडिओ गुगलने हटविले नाहीत तर त्यांच्या सेवेचा वेग कमी केला जाईल, असा इशारा रशियन यंत्रणेने दिला होता. गुगलला यासंदर्भात जवळपास 26 हजार नोटिसा पाठविण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.

गुगल व फेसबुकत्यानंतर मंगळवारी रशियन न्यायालयात झालेल्या सुनावणीत गुगल व फेसबुक या दोन्ही कंपन्यांना दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले. गुगलला तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 82 हजार डॉलर्सचा दंड सुनावण्यात आला आहे. तर फेसबुकवर आठ वेगवेगळ्या प्रकरणांसाठी 3 लाख, 53 हजार डॉलर्सच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांविरोधात करण्यात आलेली ही तिसरी कारवाई ठरली आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात ‘ट्विटर’ला बंदी घातलेला मजकूर न हटविल्याप्रकरणी एक लाख 20 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याचवेळी ट्विटरच्या सेवेचा वेगही कमी करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यापूर्वी चीनमधील ‘टिकटॉक’ या कंपनीलाही रशियाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. याव्यतिरिक्त रशिया व ‘यु ट्यूब’मध्येही कायदेशीर लढाई सुरू असून त्याची सुनावणी जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जर्मन यंत्रणांकडून गुगलची चौकशी सुरू

बर्लिन – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणार्‍या गुगलविरोधात जर्मन यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. आर्थिक बळ व बाजारपेठेतील प्रभावाच्या जोरावर इतर कंपन्यांना स्पर्धा करण्यापासून रोखण्याचा ठपका गुगलवर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे कारवाई होणारी गुगल ही तिसरी मोठी कंपनी ठरली आहे. यापूर्वी जर्मन यंत्रणांनी ‘अ‍ॅमेझॉन’ व ‘फेसबुक’ या कंपन्यांचीही चौकशी सुरू केली आहे. जर्मनीव्यतिरिक्त अमेरिका तसेच युरोपिय महासंघानेही ‘बिग टेक’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या बड्या कंपन्यांविरोधात कारवाईसाठी पावले उचलल्याचे समोर आले आहे.

leave a reply