युक्रेन-नाटो वाढत्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून फिनलंड व नॉर्वेच्या सीमेजवळ न्यूक्लिअर बॉम्बर्स तैनात

न्यूक्लिअर बॉम्बर्समॉस्को/किव्ह – अमेरिका व नाटोकडून युक्रेनला करण्यात येणाऱ्या वाढत्या संरक्षणसहकार्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने युरोपियन सीमेनजिक आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ची तैनाती वाढविण्यास सुरुवात केली आहे. फिनलंड व नॉर्वेच्या सीमेनजिक असलेल्या ‘ओलेन्या एअरबेस’वर रशियाने तब्बल 11 ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर्स’ तसेच ‘केएच-101’ क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे उघड झाले. काही दिवसांपूर्वीच नाटोने ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर रशियाची आण्विक तैनाती समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

रशियाने गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढविले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील पायाभूत सुविधा तसेच लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले होते. आठ महिन्यानंतरही रशियाने युक्रेनवर इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले केल्याने पाश्चिमात्य आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. या हल्ल्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुहल्ल्याची धमकी देऊन ती पोकळ नसल्याचे बजावले होते.

न्यूक्लिअर बॉम्बर्सत्यानंतर काही दिवसांनी नाटोने 17 ऑक्टोबरपासून ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ आयोजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नाटोच्या या घोषणेपाठोपाठ युक्रेनने आपण नाटोचा ‘डिफॅक्टो मेंबर’ बनल्याचे म्हटले होते. नाटोची सरावाची घोषणा व त्यापाठोपाठ युक्रेनने केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. या पार्श्वभूमीवर रशियाने युरोपिय सीमेनजिक आण्विक तैनाती वाढविण्याचे वृत्त समोर आले आहे.

नॉर्वेच्या एका वेबसाईटने अमेरिकी कंपनीकडून मिळालेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्सच्या हवाल्याने रशियाच्या तैनातीचे वृत्त उघड केले. रशियाचा ओलेन्या हा हवाईतळ फिनलंडच्या सीमेपासून 95 तर नॉर्वेच्या सीमेपासून 115 मैलांवर आहे. ऑगस्ट महिन्यात रशियाच्या या तळावर कोणतीही बॉम्बर्स अथवा लढाऊ विमाने तैनात नव्हती. मात्र ऑक्टोबर महिन्यात या तळावर ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर्स’ व क्षेपणास्त्रांची तैनाती सुरू झाली.

न्यूक्लिअर बॉम्बर्ससध्या तळावर 11 ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर बॉम्बर्स’ तैनात करण्यात आली असून त्यात सात ‘टीयू-160’ व चार ‘टीयू-95’ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आण्विक हल्ल्याची क्षमता असणारी ‘केएच-101’ ही क्षेपणास्त्रेही तळावर असल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या या तैनातीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून रशियाच्या ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ची घोषणा होऊ शकते, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, युक्रेनकडून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने खेर्सन प्रांतातील नागरिकांना रशियाच्या हद्दीत हलविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रशियन तुकड्या सहाय्य करतील, असेही रशियाकडून सांगण्यात आले. शुक्रवारपासून खेर्सनमधील नागरिक रशियाच्या रोस्तोव्ह प्रांतात येण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त रशियाची वृत्तसंस्था ‘तास’ने दिले आहे. युक्रेनकडून खेर्सनमध्ये प्रतिहल्ले सुरू असतानाच रशियन फौजांनी डोन्बासमधील बाखमत शहराजवळ आगेकूच केल्याचे सांगण्यात येते. पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे.

leave a reply