- अमेरिकेसह पाश्चात्य देश उन्माद पसरवित असल्याचा रशियाचा आरोप
- बायडेन प्रशासन युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा करण्याच्या तयारीत
किव्ह/वॉशिंग्टन/मॉस्को – रशिया पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीत युक्रेनवर आक्रमण करील, असा इशारा युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या प्रमुखांनी दिला. त्याचवेळी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी रशियन लष्कराच्या हालचालींची माहिती देणारे नकाशे तसेच सॅटेलाईट फोटोग्राफ्स युरोपिय देशांना दिल्याचे सांगण्यात येते. रशियाकडून चाललेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा करण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत. पाश्चात्य देशांकडून सुरू असलेल्या या हालचाली म्हणजे उन्माद पसरविण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोप रशियाने केला आहे. यामुळे युक्रेन सीमेवरील तणाव वाढत असल्याची टीकाही रशियाने केली.
गेल्या महिन्याभरात रशिया व युक्रेनमधील तणाव अधिकच चिघळण्यास सुरुवात झाली आहे. बेलारुसमधील वाढते लष्करी सराव, पोलंडमध्ये सुरू असलेली निर्वासितांची घुसखोरी, इंधनपुरवठ्यावरून होणारे वाद व युक्रेन सीमेनजिकच्या हालचाली ही यामागील कारणे असल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच युक्रेनने नाटोचा सदस्य होण्याबाबत उघड इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ही बाब रशियाच्या सुरक्षेला धोका असून नाटोत युक्रेनचा समावेश ही रशियन हितसंबंधांसाठी ‘रेड लाईन’ असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले होते. रशिया त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशाराही पेस्कोव्ह यांनी दिला होता. रशियाकडून युक्रेन सीमेनजिक सुरू असलेली मोठी लष्करी जमवाजमव त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. युक्रेन तसेच अमेरिकन यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेन सीमेनजिक तब्बल ९२ हजार जवान तैनात केले आहेत. यात रशियन लष्कराच्या आघाडीच्या तुकड्यांसह, बटालियन टॅक्टिकल ग्रुप्सचा समावेश आहे. या तुकड्या कोणत्याही क्षणी हल्ला चढवायच्या तयारीसाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येते.
युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्सच्या प्रमुखांनी दिलेल्या इशार्यात, रशिया पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हल्ला चढवू शकतो, असे म्हटले आहे. हा हल्ला बेलारुसच्या सीमेतून घुसखोरी, हवाईहल्ले व ‘ऍम्फिबियस ऍसॉल्ट’च्या माध्यमातून होईल, असेही युक्रेनच्या अधिकार्यांनी बजावले. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी शेअर केलेल्या माहितीतूनही याला दुजोरा मिळाला आहे. अमेरिकन यंत्रणांनी आपल्याकडील माहिती युरोपियन देशांना पुरविली आहे. त्याचवेळी रशियाच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर बायडेन प्रशासनाने युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
अमेरिका युक्रेनला ‘जॅव्हेलिन अँटी टँक मिसाईल’, ‘स्टिंगर’ क्षेपणास्त्रे व ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर्सचा पुरवठा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापूर्वी तातडीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून अमेरिकेने युक्रेनला दोन ‘आयलंड क्लास’ गस्ती नौका पाठविल्या आहेत. युक्रेन व अमेरिकेसह नाटोकडून सुरू असलेल्या हालचालींवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
‘अमेरिकेसह इतर पाश्चात्य देश युक्रेनच्या मुद्यावर कृत्रिमरित्या उन्माद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशियावर लष्करी हालचालींचा आरोप करणारे देशच युक्रेननजिक मोठ्या प्रमाणावर संरक्षण तैनाती करीत आहेत. पाश्चात्य देशांकडून व्यापक प्रचारमोहिम राबविण्यात येत असून, त्यामुळे तणाव अधिकच चिघळत आहे’, असा आरोप रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला. रशियाची गुप्तचर यंत्रणा ‘एसव्हीआर’नेही स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध करून अमेरिकेवर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेचे अधिकारी आंतरराष्ट्रीय समुदायाला घाबरविण्याचे काम करीत आहेत, असे रशियन यंत्रणेने बजावले.