तेहरान – पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांना बगल देण्यासाठी रशिया आणि इराणने स्वत:ची स्वतंत्र बँकिंग यंत्रणा सुरू केली आहे. अमेरिकन डॉलरमधील व्यवहार आणि स्विफ्टला पर्याय म्हणून रशिया-इराणमधील ही बँकिंग यंत्रणा काम करणार असल्याची घोषणा इराणने केली. यामुळे 700 रशियन, तर 13 देशांमधील 106 बँका सदर यंत्रणेशी जोडल्या जाणार आहेत. याआधीच या दोन्ही देशांनी पर्यायी चलन तसेच सोन्याचे पाठबळ असलेली क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्याचे संकेत दिले होते. रशिया-इराणमधील हे सहकार्य अमेरिका व पाश्चिमात्य मित्रदेशांना धक्का देणारे ठरत आहे.
‘सोसायटी फॉर वर्ल्डवाईड इंटरबँक फायनान्शिअल टेलिकम्युनिकेशन-एसडब्ल्यूआयएफटी’ अर्थात स्विफ्ट ही बेल्जिअम स्थित सहकारी संस्था आहे. जगभरातील बँकांमधील परस्पर आर्थिक व्यवहार सुरळीत करणारी संस्था म्हणून स्विफ्टचा उल्लेख केला जातो. दोन किंवा त्याहून अधिक देश तसेच संघटनांमधील व्यवहारांसाठी वापरले जाणारे लेटर ऑफ क्रेडिट, ट्रान्सफर किंवा वॉरंटी देण्यासाठी स्विफ्टचा वापर सहाय्यक ठरतो. यामध्ये जागतिक सदस्यांचे समभाग असल्यामुळे कुठल्याही देशाची मालकी या संस्थेवर नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका डॉलरबरोबरच स्विफ्टचाही वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोप होत आहे.
अमेरिकेने 2018 साली अणुकार्यक्रमावर ठाम असलेल्या इराणवर आर्थिक निर्बंध जाहीर केले. त्याचबरोबर इराणला स्विफ्टपासूनही तोडले होते. त्यामुळे इराणसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विफ्टद्वारे डॉलरमध्ये होणारे व्यवहार बंद झाले होते. त्याचा परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. इराणमधील महागाई 50 टक्क्यांवर पोहोचली असून तरुण बेरोजगारांच्या प्रमाणातही 50 टक्के वाढ झाल्याचा दावा केला जातो. इराणच्या अर्थव्यवस्थेला वेळीच सावरले नाही तर देश सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाऊ शकतो, असा इशारा दिला जात आहे.
तर गेल्या वर्षी युक्रेनबरोबर युद्ध पुकारणाऱ्या रशियावरही अमेरिकेने निर्बंध जाहीर केले आहेत. तसेच इराणप्रमाणे रशियालाही स्विफ्टमधून बाहेर केले आहे. यामुळे रशियन बँकांचे डॉलरमधील व्यवहार ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत, रशिया व इराणच्या मध्यवर्ती बँकांनी एकत्र येऊन स्वत:ची स्वतंत्र बँकिंग यंत्रणा सुरू केली आहे. दोन्ही देशांच्या बँकांमधील संपर्क आणि व्यवहार यंत्रणा जोडल्या गेल्याची घोषणा इराणच्या सेंट्रल बँकेचे उप गव्हर्नर मोहसेन करीमी यांनी केली. यामुळे इराणच्या बँकांना यापुढे रशियाबरोबरील व्यवहारांसाठी तसेच लेटर ऑफ क्रेडिट किंवा ट्रान्सफरसाठी स्विफ्टचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही, असे करीमी म्हणाले. या नव्या यंत्रणेमध्ये रशियातील जवळपास 700 तर इतर 13 सहकारी देशांमधील 106 बँका जोडल्या गेल्याची माहिती करीमी यांनी दिली. पण यातील बँकांची तसेच इतर देशांची नावे जाहीर करण्याचे करीमी यांनी टाळले. दोन दिवसांपूर्वी राजधानी तेहरानमध्ये रशिया व इराणच्या मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरमध्ये यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे रशिया व इराणमधील सहकार्य अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास इराणी माध्यमे व्यक्त करीत आहेत. तसेच याचा फायदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होईल, असा दावा इराणची माध्यमे करीत आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या डॉलरला बगल देण्यासाठी रशियाने इतर देशांबरोबर रुबल तसेच संबंधित देशांच्या चलनामध्ये व्यवहार सुरू केले आहेत. तर रशिया व इराण एकत्र येऊन सोन्यावर आधारलेली क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा दावा रशियन माध्यमांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.