दमास्कस – रशियन लढाऊ विमानांनी सिरियामध्ये गेल्या ७२ तासात १७० हून अधिक ठिकाणांवर हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये ‘आयएस’चे १२ दहशतवादी व १९ सिरियन जवान ठार झाले आहेत. सिरियातील मानवाधिकार संघटनेने याची माहिती प्रसिद्ध केली आहे. सिरिया आणि रशियाकडून याबाबतचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.
सिरियातील ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियन लढाऊ विमाने सलग तीन दिवस सिरियात हवाई हल्ले चढवित आहेत. सिरियन लष्कराने ‘आयएस’च्या दहशतवाद्यांविरोधात लष्करी मोहीम छेडली आहे. तर रशियन लढाऊ विमाने हवाई हल्ले चढवून त्यांना साथ देत आहेत. गेल्या चोवीस तासात रशियन लढाऊ विमानांनी ४० हवाई हल्ले केले. तर तीन दिवसात १७० हून अधिक ठिकाणांवर रशियन लढाऊ विमानांनी हल्ले चढविले.
सिरियाच्या पूर्वेकडील हमा प्रांतातील ‘अथारिया’ तर राक्का प्रांतातील ‘अल-रसाफ’ आणि होम्स प्रांतातील ‘अल-सुखनाह’ या प्रदेशांमध्ये ही कारवाई करण्यात आली. सिरियन लष्कराबरोबर राष्ट्राध्यक्ष अस्साद यांचे समर्थक व टोळ्यांची संयुक्त ‘नॅशनल डिफेन्स फोर्सेस’ (एनडीएफ) संघटना या मोहिमेमध्ये ‘आयएस’विरोधात लढत होती. तीन वेगवेगळ्या प्रांतात सुरू असलेल्या तीन दिवसांच्या या संघर्षात अस्साद सरकारचे १९ जवान मारले गेले. तर रशियाच्या हवाई हल्ल्यात आणि सिरियन लष्कराच्या कारवाईत १२ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सिरियन मानवाधिकार संघटनेने दिली.
तर सिरियाच्या पूर्वेकडील ‘देर अल-झोर’ भागात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाल्याचा दावा केला जातो. आखातातील दैनिकाने यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली. सिरियातील अस्साद राजवट आणि लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. जगभरात दहशत पसरविणारी ‘आयएस’ ही संघटना सिरियामध्ये पुन्हा एकदा जोर पकडू लागल्याचा दावा केला जातो. वर्षभरापूर्वी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातील ‘आयएस’चा प्रभाव संपविल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर सिरियातील अमेरिकी सैनिकांच्या माघारीचा निर्णय जाहीर केला होता. अमेरिकेच्या कारवाईनंतर सिरियातील ‘आयएस’च्या कारवाया थंडावल्याचे बोलले जात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सिरियातून प्रसिद्ध होणार्या बातम्या पाहता, ‘आयएस’ पुन्हा एकदा सिरियात डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियाच्या पूर्वेकडील ‘देर अल-झोर’ भागात सिरियन लष्कराच्या बसवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान मारले गेले होते. ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. इराक आणि सिरियाच्या सीमेजवळील भागात हा हल्ला झाल्यामुळे दोन्ही देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होत्या.