निर्वासितांची घुसखोरी व लष्करी तैनातीच्या माध्यमातून युरोप उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा कट

- युक्रेनचा आरोप

किव्ह/मॉस्को – बेलारुसच्या माध्यमातून युरोपात निर्वासित घुसवून व युक्रेन सीमेवर लष्करी तैनाती वाढवून रशियाने युरोप उद्ध्वस्त करण्याचा कट आखल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. नाटोच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी, निर्वासित व तैनाती या दोन्ही घटना वेगळ्या नसून एकाच रशियन धोरणाचा भाग आहेत, असे बजावले. यावेळी नाटोच्या प्रमुखांनी युक्रेनजवळील तैनातीच्या मुद्यावरून रशियाला इशाराही दिला आहे.

निर्वासितांची घुसखोरी व लष्करी तैनातीच्या माध्यमातून युरोप उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा कट - युक्रेनचा आरोपकाही दिवसांपूर्वीच, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी युरोपिय देशांना रशिया-युक्रेन युद्धाबाबत बजावले होते. त्यानंतर ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख सर जनरल निक कार्टर यांनी, शीतयुद्धानंतर प्रथमच पाश्‍चात्य देश व रशियामधील युद्धाचा धोका वाढल्याचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ आता युक्रेन तसेच नाटोकडूनही रशियाच्या आक्रमक हालचालींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ही बाब पाश्‍चात्य देशांमधील रशियाबाबतची वाढती अस्वस्थता दाखवून देणारी असल्याची जाणीव विश्‍लेषक करून देत आहेत.

बेलारुसमधून पोलंड व इतर युरोपिय देशांमध्ये हजारो निर्वासित घुसविण्यात आले आहेत. यामागे आपला हात नसल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत आहे. मात्र पोलंडसह इतर युरोपिय देशांनी बेलारुसचे सर्वेसर्वा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यामागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेच असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे. युरोपिय माध्यमे व विश्‍लेषकांनी दिलेल्या माहितीतही बेलारुसमधून घुसविण्यात येणार्‍या निर्वासितांमागील रशियन कनेक्शन दाखवून देण्यात आले आहे.

निर्वासितांची घुसखोरी व लष्करी तैनातीच्या माध्यमातून युरोप उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा कट - युक्रेनचा आरोपबेलारुसमधून निर्वासितांची घुसखोरी सुरू असतानाच रशियाने युक्रेन सीमेवरील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविणे हा योगायोग नसल्याकडे युक्रेनच्या मंत्र्यांनी लक्ष वेधले. ‘निर्वासितांचा वापर शस्त्राप्रमाणे करण्यात येत आहे. माहितीचा अपप्रचार देखील शस्त्र बनले आहे.

इंधनाचाही वापर शस्त्राप्रमाणे आणि मोठी लष्करी तैनातीही; या सर्व घटना वेगवेगळ्या नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. हे सर्व युरोपला एकत्र ठेवणार्‍या व पुतिन यांच्या सत्तेला आव्हान देणार्‍या आघाडीला उद्ध्वस्त करण्याच्या रशियन धोरणाचाच भाग आहे’, असा गंभीर आरोप युक्रेनचे परराष्ट्रमंत्री कुलेबा यांनी केला.

कुलेबा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही रशियाला लक्ष्य केले. रशियाने कोणत्याही प्रकारच्या आक्रमक कारवायांचे धाडस करु नये, असे नाटो प्रमुखांनी बजावले. नाटो सदस्य देश युक्रेनच्या पाठीशी असल्याची जाणीवही स्टॉल्टनबर्ग यांनी रशियाला करुन दिली.

leave a reply