रशियाकडून तुर्कीत ‘गॅस हब’ उभारण्याचा प्रस्ताव

‘गॅस हब’मॉस्को/अस्ताना – युरोपिय देशांसह इतर देशांना नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा करण्यासाठी तुर्कीत ‘गॅस हब’ उभारण्याचा प्रस्ताव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. तुर्कीतील हा प्रस्तावित ‘हब’ केवळ इंधनपुरवठाच नाही तर इंधनाचे दर ठरविण्यासाठीही महत्त्वाचा ठरु शकेल, असे संकेत रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिले. तुर्कीने यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून दोन्ही देशांच्या यंत्रणा लवकरच तांत्रिक बाजूंचा अभ्यास सुरू करतील, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी म्हटले आहे. युरोपियन देशांकडून लादण्यात येणारे निर्बंध व रशियाने रोखलेला इंधनपुरवठा या पार्श्वभूमीवर नव्या हबचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गुरुवारी कझाकस्तानची राजधानी अस्तानामध्ये मध्य आशियाई देश व रशियाची परिषद सुरू झाली. या परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, पुतिन यांनी तुर्कीसमोर ‘गॅस हब’चा प्रस्ताव ठेवला. ‘तुर्कीतील प्रस्तावित इंधनवायू मध्यवर्ती केंद्र हे इंधनवायूचे दर ठरविण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरु शकते. रशिया व तुर्की एकत्र येऊन हे केंद्र उभारु शकतात व तो फक्त इंधनाच्या पुरवठ्यासाठीच नाही तर दरांची निश्चिती करण्यासाठीही महत्त्वाचा ठरेल. सध्या इंधनवायूचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर बाजारपेठेच्या निकषांनुसार, कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना सामान्य स्तरावर आणले जाऊ शकतात’, अशा शब्दात पुतिन यांनी तुर्कीला प्रस्ताव दिला आहे.

‘गॅस हब’सध्या रशिया व तुर्कीदरम्यान दोन इंधनवाहिन्या कार्यरत आहेत. त्यात ‘ब्ल्यू स्ट्रीम’ व ‘तुर्कस्ट्रीम’ यांचा समावेश आहे. ‘ब्ल्यू स्ट्रीम’ 2003 सालापासून सक्रिय असून या इंधनवाहिनीच्या माध्यमातून तुर्कीला दरवर्षी 16 अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविण्यात येतो. तर ‘तुर्कस्ट्रीम’ 2020 साली कार्यरत झाली असून या माध्यमातून तुर्कीसह युरोपिय देशांना 31.5 अब्ज घनमीटर इंधनवायूचा पुरवठा करण्यात येतो. याव्यतिरिक्त रशिया व तुर्कीमध्ये ‘ब्ल्यू स्ट्रीम 2’ इंधनवाहिनीसंदर्भातही चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेला प्रस्ताव युक्रेनला समर्थन देणाऱ्या तसेच रशियावर निर्बंध लादणाऱ्या युरोपिय देशांसाठी मोठा धक्का ठरतो. युरोपिय महासंघाकडून रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले असले तरी हंगेरीसह काही देशांना त्यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या देशांकडून अजूनही रशियन इंधनवायूचा पुरवठा सुरू आहे. हंगेरीने भविष्यातील इंधनआयातीसाठीही रशियाबरोबर करार केले आहेत.

leave a reply