मॉस्को – ‘पाश्चिमात्य देशांबरोबरील राजनैतिक संबंध तोडून रशियावरील निर्बंधांना लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. पाश्चिमात्य देशांची रशियामधील संपत्ती गोठवण्यात येईल. तसेच अमेरिकेबरोबर केलेल्या आण्विक शस्त्रांबाबतच्या करारातूनही रशिया माघार घेईल’, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसविल्यानंतर अमेरिका व पाश्चिमात्य मित्रदेशांनी रशियावर कठोर निर्बंधांची घोषणा केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ नेते, संलग्न अब्जाधीश, उद्योगपती, बँका आणि व्यापारी वर्ग यांच्यावर अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघाने निर्बंध जाहीर केले होते. तसेच रशियातील सेमीकंडक्टर आणि लष्कराशी जोडलेल्या कंपन्यांना पाश्चिमात्य देशांनी या निर्बंधांमध्ये लक्ष्य केले होते.
गेल्या काही तासांमध्ये यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, जपान या अमेरिकेच्या सहकारी देशांची भर पडली आहे. या निर्बंधांमुळे रशियन चलन घसरल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. रशियावर लादलेले हे निर्बंध रशियन राजवटीला धडा शिकविणारे ठरतील, असा दावा पाश्चिमात्य नेते, विश्लेषक व माध्यमांनी केला होता. पण रशियाने या निर्बंधांना तोंड देण्याची तयारी आधीपासूनच केली होती, असा दावा तज्ज्ञांनी केला होता.
रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना या प्रत्युत्तराचा इशारा दिला. याची सुरुवात पाश्चिमात्य देशांबरोबरील राजनैतिक संबंध तोडून करण्यात येईल. तसेच पाश्चिमात्य देश, नेते, उद्योगपती आणि कंपन्यांची रशियातील संपत्ती गोठविण्यात येईल व यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाल्याचे संकेत रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिले.
तर रशिया व अमेरिकेत झालेल्या आण्विक शस्त्रांबाबतच्या करारातूनही रशिया माघार घेणार असल्याचे मेदवेदेव्ह म्हणाले. याद्वारे रशियाने आपल्या आण्विक शस्त्रास्त्रांच्या संख्येत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर मानवाधिकारांचे खोटे आरोप करून रशियाला ‘काऊन्सिल ऑफ युरोप’मधून बाहेर काढण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रशिया मृत्यूदंडाची शिक्षा अंमलात आणली जाईल, असे मेदवेदेव्ह म्हणाले. रशियावर निर्बंध लादून पाश्चिमात्य देशांनी आपली राजकीय अक्षमता दाखवून दिल्याची जळजळीत टीका मेदवेदेव्ह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.