दमास्कसजवळील इस्रायलच्या हल्ल्यानंतर रशिया-सिरियाचा संयुक्त हवाई सराव

हवाई सरावदमास्कस – जगाचे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडे लागलेले असताना, रशियाने सिरियन हवाईदलासोबत मोठा सराव केला. या सरावात रशिया आणि सिरियाने शत्रूची विमाने आणि ड्रोन्स पाडण्याचा अभ्यास केला. इस्रायलने सिरियात केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पुढच्या काही तासात रशिया व सिरियन हवाईदलाचा हा सराव पार पडला, याकडे माध्यमे लक्ष वेधत आहेत. गेल्या महिन्यात सिरियात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायली विमानांविरोधात रशियाने आपली ‘एस-300′ यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यामुळे इस्रायलला इशारा देण्यासाठी रशिया व सिरियामध्ये हा सराव पार पडल्याचे दिसत आहे.

रशिया-युक्रेनमधील युद्धाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. या युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाविरोधात टोकाची भूमिका स्वीकारुन कठोर आर्थिक निर्बंध लादले होते. तसेच पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य सुरू केले होते. त्यावेळी इस्रायलने रशियाविरोधात भूमिका घेण्याचे टाळले होते. पण युक्रेनच्या युद्धाबाबत इस्रायलने स्वीकारलेल्या भूमिकेत बदल होऊ लागल्याचे समोर येत आहे.

हवाई सरावइस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी उघडपणे रशियावर आरोप करून इस्रायलच्या भूमिकेतील बदल जाहीर केला. तसेच युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविणार असल्याची माहिती इस्रायलने दिली होती. यामुळे संतापलेल्या रशियाने इस्रायलला दुसऱ्या महायुद्धाची आठवण करून दिली होती. त्यानंतर इस्रायल व रशियाचे संबंध ताणले होते.

अशा परिस्थितीत इस्रायलने सिरियात हवाई हल्ले सुरू केले. आत्तापर्यंत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांबाबत कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचे धोरण सिरियामध्ये तैनात रशियन लष्कराने स्वीकारले होते. पण गेल्या महिन्यात सिरियातील लष्करी ठिकाणांवर हल्ले चढविणाऱ्या इस्रायली विमानांविरोधात रशियाने ‘एस-300′ ही हवाई सुरक्षा यंत्रणा वापरली. यातून प्रक्षेपित झालेल्या क्षेपणास्त्रांपासून इस्रायली विमाने बचावली खरी. पण रशियाने इस्रायलविरोधात आपली यंत्रणा वापरल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वी इस्रायली विमानांनी सिरियाची राजधानी दमास्कसजवळ हल्ले चढविले. यानंतर अवघ्या काही तासातच मंगळवारी, रशिया आणि सिरियाच्या हवाईदलामध्ये सराव पार पडला. सिरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन हवाईदलातील दोन ‘सुखोई-35′ लढाऊ विमाने आणि सिरियन हवाईदलातील सहा ‘मिग-23′ आणि ‘मिग-29′ या लढाऊ विमानांनी या सरावात सहभाग घेतला होता. रात्रीच्या अंधारात शत्रूची लढाऊ विमाने आणि ड्रोन्सवर हल्ले चढविण्याचा अभ्यास यावेळी पार पडल्याचे सिरियन लष्कराने जाहीर केले.

दरम्यान, युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना रशियाने सिरियात हवाई सराव आयोजित करून युक्रेनला सहाय्य करणाऱ्या इस्रायल व इतर देशांना इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

leave a reply