जागतिक स्थैर्यासाठी रशिया-युएई सहकार्य महत्त्वाचे ठरते

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

सेंट पीट्सबर्ग – ‘आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत असताना, रशिया व युएईमधील सहकार्य या क्षेत्रासह जागतिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युएईबरोबरच्या सहकार्याचा दाखला दिला. तर ओपेक प्लसच्या बैठकीत घेण्यात आलेला इंधनाच्या कपातीचा निर्णय कुठल्याही देशाविरोधात नसल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले.

russia-putinयुएईचे राष्ट्राध्यक्ष आणि सर्वेसर्वा शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांनी मंगळवारी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. ओपेक प्लसचा निर्णय, युक्रेनबरोबरचे युद्ध आणि इतर मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडल्याचा दावा केला जातो. या दरम्यान, राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद यांना थंडी असह्य झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपला कोट युएईच्या राष्ट्रप्रमुखांना दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याद्वारे रशिया व युएईच्या राष्ट्रप्रमुखांनी पाश्चिमात्य देशांना संदेश दिल्याचा दावा केला जातो.

तर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी माध्यमांशी बोलताना, उभय देशांमधील सहकार्याचा दाखला दिला. तसेच गेल्या आठवड्यात इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याबाबत युएईने घेतलेल्या निर्णयाचेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले. ‘जागतिक इंधनाच्या बाजारात स्थैर्य राखण्यासाठी ओपेक प्लस देशांनी इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. ओपेक प्लसच्या बैठकीतील निर्णय कुठल्याही देशाविरोधात नव्हते’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या टीकेला उत्तर दिले.

इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याच्या ओपेक प्लसच्या निर्णयावर पाश्चिमात्य देशांनी टीका केली होती. यामुळे इंधनाचे दर 110 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचतील, असा दावा केला जात होता. तर या निर्णयाला कडाडून विरोध करणाऱ्या अमेरिकेने सौदी व युएईच्या लष्करी सहाय्यात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत, युएईच्या राष्ट्रप्रमुखांनी रशियाचा केलेला दौरा अतिशय महत्त्वाचा असल्याचा दावा केला जात होता. रशियन राष्ट्राध्यक्षांनी युएईबरोबरचे सहकार्य जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून पाश्चिमात्य देशांना संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply