नव्या हल्ल्यानंतर अणुप्रकल्प बंद पाडण्याचा रशियाचा इशारा

shutting-down-nuclear-plantमॉस्को/किव्ह – युक्रेनच्या लष्कराने झॅपोरिझिआमध्ये अणुप्रकल्पावर हल्ले होत राहिले, तर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असा इशारा रशियाने दिला आहे. मंगळवारी युक्रेनने या प्रकल्पाच्या परिसरात गायडेड मिसाईल डागल्याचा आरोप रशियाने केला होता. त्यानंतर रशियाने हा इशारा दिला. त्यामुळे झॅपोरिझिआमधील परिस्थिती पुन्हा चिघळली असून युक्रेनने आण्विक दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन इमर्जन्सी सराव सुरू केल्याचे जाहीर केले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन शुक्रवारी युक्रेनला भेट देणार आहेत. या भेटीपूर्वी किंवा त्यादरम्यान अणुप्रकल्पात चिथावणीखोर कारवाई केली जाऊ शकते, असे रशियाच्या संरक्षण विभागाने बजावले आहे.

nuclear-plant-shutting-downझॅपोरिझिआ अणुऊर्जा प्रकल्प युक्रेनसह युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. त्याची क्षमता तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम तसेच अणुइंधनाचा साठा आहे. सध्या या प्रकल्पात युक्रेनी कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावर ताबा मिळविला होता.

गेल्या महिन्यात युक्रेनने दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या ताब्यात असणाऱ्या भागांवर प्रतिहल्ले सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये सदर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रशियाने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात लष्कर तसेच प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात केल्या आहेत. रशियाच्या या तैनातीला धक्का देण्यासाठी युक्रेनी फौजा प्रकल्पाच्या नजिकच्या परिसराला लक्ष्य करीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र युक्रेन तसेच पाश्चिमात्य यंत्रणांनी हे दावे फेटाळले असून रशियाच प्रकल्पाच्या परिसरात हल्ले घडवून त्याचा दोष युक्रेनवर ढकलत असल्याचे म्हटले आहे.

shutting-down-Nuclear-Mapरशियाने झॅपोरिझिआ प्रकल्पाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने या मुद्यावर सुरक्षा परिषदेची बैठकही बोलावली होती. या बैठकीत रशियाने प्रकल्पात दुर्घटना घडल्यास पूर्ण युरोप खंडाला भयावह आण्विक संकटाला सामोरे जावे लागेल, याकडे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर या संकटासाठी युक्रेन व त्याला समर्थन देणारे देश कारणीभूत असतील, असेही बजावले होते. मात्र तरीही प्रकल्पाच्या परिसरात हल्ले सुरू राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रशियाने आता थेट प्रकल्प बंद करण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी प्रकल्पाच्या परिसरातील वापरलेल्या अणुइंधनाच्या साठ्यापासून अवघ्या १० मीटर अंतरावर क्षेपणास्त्र पडल्याचा आरोप रशियाने केला. इतर रॉकेट्स व क्षेपणास्त्रे स्टोरेज साईटपासून ५० ते २०० मीटरच्या परिसरात पडल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. आठवड्याभरात युक्रेनने केलेला हा दुसरा हल्ला ठरतो. युक्रेनचे या नव्या हल्ल्यांवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवित अणुप्रकल्प बंद करण्याची भूमिका घेतली आहे. त्यापूर्वी येत्या काही दिवसात युक्रेन प्रकल्पात चिथावणीखोर हल्ले चढविण्याची शक्यता असल्याचा इशाराही दिला. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांच्या दौऱ्यादरम्यान अशा प्रकारची चिथावणी दिली जाईल, असे रशियाच्या संरक्षण विभागाने बजावले.

दरम्यान, अणुप्रकल्पातील दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन युक्रेनने आपत्कालिन सरावाला सुरुवात केली आहे. झॅपोरिझिआनजिकच्या भागात युक्रेनच्या यंत्रणांनी सराव सुरू केल्याचे स्थानिक तसेच पाश्चिमात्य माध्यमांकडून सांगण्यात आले. सदर प्रकल्पाचा वापर कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईसाठी होऊ नये, उलट सदर परिसर ‘डिमिलिटराईझ्ड् झोन’ व्हावा यासाठी रशिया व युक्रेनने पावले उचलायला हवीत, असे आवाहनही संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून नुकतेच करण्यात आले होते.

leave a reply