मॉस्केो – डिजिटल रुबलचा वापर हा रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून प्राधान्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी एक आहे. पुढील वर्षापासून रशियात त्याचा वापर सुरू करण्यासाठी तयारी सुरू आहे, असे संकेत मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर एल्विरा नबिउलिना यांनी दिले. डिजिटल रुबलबरोबरच ‘मिर बँकिंग कार्डस्’ची व्याप्ती इतर देशांमध्ये वाढविण्यासाठीही प्रयत्न चालू असल्याचे गव्हर्नर नबिउलिना यांनी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी टाकलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून बॅकिंग व्यवहारांसाठी विविध पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. डिजिटल रुबल व मिर कार्डस् या दोन्ही योजना त्याचाच भाग आहेत.
फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणाऱ्या कठोर निर्बंधांची घोषणा केली होती. या निर्बधांमुळे रशियन चलन रुबलच्या मूल्यात अभूतपूर्व घसरण झाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका डॉलरसाठी तब्बल 150 रुबल्स मोजणे भाग पडत होते. मात्र अवघ्या महिन्याभरात रशियन चलनाने युक्रेन संघर्षापूर्वी असलेली पातळी गाठण्यात यश मिळवले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यवहारांमध्ये एका डॉलरसाठी 80 रुबल्स अशी नोंद करण्यात आली.
रुबल स्थिर होताना दिसत असला तरी रशियन अर्थव्यवस्थेवर पाश्चिमात्यांनी लादलेले कठोर निर्बंध कायम आहेत. पुढील काळात त्याचे अधिक तीव्र परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर होतील, असे भाकित वर्तविण्यात येत आहे. या संभाव्य परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी रशियाने विविध योजनांना गती देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने ‘हॅलो’ नावाची नवी पेमेंट सिस्टिम सुरू केली होती. त्यानंतर आता डिजिटल रुबल व मिर कार्डस्च्या वापराला वेग देण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे.
‘डिजिटल रुबलच्या योजनेवर प्राधान्याने काम सुरू आहे. रशियाने डिजिटल रुबलचा नमूना वेगाने विकसित केला होता. सध्या विविध बँकांबरोबरच चाचण्यास सुरु आहेत. पुढील वर्षी डिजिटल रुबलचे प्राथमिक व्यवहार सुरू होतील’, असे मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर नबिउलिना यांनी सांगितले. रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मिर कार्डस्’ अधिकाधिक देशांमध्ये स्वीकारली जावीत यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे नबिउलिना यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणाऱ्या ‘व्हिसा’ व ‘मास्टरकार्ड’ने रशियातील सेवा बंद केली आहे. त्यामुळे ‘मिर कार्डस्’ची व्याप्ती वाढविण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. रशियाने 2015 साली ही कार्डस् सुरू केली होती. सध्या रशियाव्यतिरिक्त तुर्की, व्हिएतनाम यासारख्या आठ देशांमध्ये मिर कार्डस्ने केलेले व्यवहार स्वीकारले जातात.