मॉस्को/किव्ह – अमेरिकेने पाठविलेली ‘एम270′ क्षेपणास्त्र यंत्रणा युक्रेनी लष्कराला मिळाली आहे. याचा वापर करून लवकरच युक्रेनचे लष्कर रशियन सैन्यावर प्रतिहल्ले चढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच्या आधी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी युक्रेनच्या डोम्बास प्रांताचा दौरा केला. युक्रेनच्या प्रतिहल्ल्याची शक्यताच निकालात काढण्यासाठी त्वरित हालचाली करून निर्णायक हल्ले चढवा, असा संदेश संरक्षणमंत्री शोईगू यांनी रशियन सैन्याला दिला. यामुळे युक्रेनच्या युद्धातील अधिक भयंकर संहार घडविणारा नवा टप्पा सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
‘लाँग रेंज मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम-एमएलआरएस’ श्रेणीत येणारी अमेरिकेची ‘एम270′ क्षेपणास्त्र यंत्रणा युक्रेनी लष्करापर्यंत पोहोचली आहे. लवकरच याचा वापर सुरू होईल. रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता असल्याचे सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी केली होती. अमेरिकेने युक्रेनी लष्कराला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्याचे जाहीर केले होते. मात्र याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाने दिला होता. त्यानुसार ‘एम270′ क्षेपणास्त्र यंत्रणा युक्रेनी लष्कराच्या हाती पडल्याच्या बातम्या येत असतानाच, रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी युक्रेनच्या डोम्बास प्रांताचा दौरा केल्याचे उघडझाले आहे.
संरक्षणमंत्री शोईगू यांनी डोम्बासमध्ये रशियन लष्कराचे जनरल सर्जेई सुरोव्हिकीन आणि कर्नल जनरल अलेक्झँडर लॅपिन यांची भेट घेतली. युक्रेनी लष्कराचा प्रतिहल्ला सुरू होऊन, ते इथल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या आधीच या भागातील लष्करी मोहीम जलदगतीने पुढे नेण्याची सूचना संरक्षणमंत्री शोईगू यांनी लष्करी अधिकाऱ्यांना केली. तसेच या युद्धात विशेष कामगिरी करून दाखविणाऱ्या कर्नल जनरल अलेक्झँडर लॅपिन आणि मेजर जनरल इसेदुल्ला अबाशेव्ह यांना गोल्ड स्टार पदकाने संरक्षणमंत्री शोईगू यांनी सन्मानित केले.
दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेनचे युद्ध आता अधिक संहारक बनणार असल्याचे दिसू लागले आहे. अमेरिकेने युक्रेनी लष्कराला शस्त्रास्त्रे पुरविली, तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असे रशियाने याआधीच बजावले होते. याच्या परिणामांपासून आपण अलिप्त राहू, या भ्रमात अमेरिकेने राहता कामा नये, असा इशारा रशियाने दिला होता. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या नेतृत्त्वालाही कडक शब्दात समज दिली होती.
युक्रेनमध्ये रशियाची लष्करी कारवाई सुरू असली, तरी खऱ्या अर्थाने रशियाने युक्रेनमध्ये युद्ध सुरू केलेले नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले होते. रशियाने आपल्या साऱ्या लष्करी क्षमतेचा वापर युक्रेनविरोधातील युद्धात अजूनही केलेला नाही, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी करून दिली होती. तसेच युक्रेनचे युद्ध लांबविण्यासाठी अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप रशियाने केला होता. याने सर्वाधिक हानी युक्रेनचीच होईल, याकडेही रशियाने लक्ष वेधले होते.