रशियाकडील परकीय गंगाजळीने ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला

मॉस्को – रशियाच्या परकीय गंगाजळीत एका आठवड्यात जवळपास सात अब्ज डॉलर्सची भर पडली असून त्याने ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. रशियाची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘बँक ऑफ रशिया’ने याची माहिती दिली.

Russia_gross_intl_reservesबाजारपेठेतील सकारात्मक बदलांमुळे परकीय गंगाजळी १.२ टक्क्यांनी वाढल्याचे ‘बँक ऑफ रशिया’ने स्पष्ट केलेे. काही दिवसांपूर्वीच रशियाने आपल्या सोन्याच्या राखीव साठ्यांमध्येही सुमारे ४० टनांची भर घातल्याची माहिती ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालात देण्यात आली होती.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाच्या परकीय गंगाजळीने विक्रमी ६४३ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला आणि रशियाला अद्दल घडविण्यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी आर्थिक निर्बंध लादले होते. यामुळे रशियन अर्थव्यवस्था जेरीस येईल, असा दावा अमेरिका व युरोपिय देशांनी केला होता. पण तसे न होता उलट रशियाची अर्थव्यवस्था अधिकच बळकट झाल्याचे उघड झाले आहे.

रशिया अनेक आघाड्यांवर स्वयंपूर्ण देश असून रशिया फारच थोड्या प्रमाणात आयात करतो. त्यामुळे अमेरिका व युरोपिय देशांनी लादलेल्या निर्बंधांचा रशियन अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट रशियन इंधनावर अवलंबून असलेल्या युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्थांवर त्यांनी रशियावर लादलेले निर्बंध उलटले, असा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत.

leave a reply