अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत-रशियाच्या आर्थिक व्यवहारावर ‘ताण’ आला

रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह

नवी दिल्ली – अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत व रशियाच्या संबंधांवर काहीसा ताण आलेला आहे, अशी कबुली रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी दिली. मात्र हा ताण आर्थिक व्यवहाराच्या पातळीपुरताच मर्यादित आहे. अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी भारतीय बँका रशियाबरोबर रुपया-रुबलमध्ये व्यवहार करताना खूपच दक्षता घेत आहेत, असा खुलासाही रशियन राजदूतांनी केला. त्याचवेळी भारताला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची व भारताबरोबर धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याची तयारी दाखविणाऱ्या अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर रशियन राजदूतांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

denis‘नेक्स्ट स्टेप इन इंडिया-रशिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप: ओल्ड फ्रेन्डस्‌‍ न्यू होरायझन’ या परिसंवादात रशियाचे राजदूत बोलत होते. सोमवारी पार पडलेल्या या परिसंवादात रशियन राजदूतांनी काही गोष्टी परखडपणे मांडल्या. युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे भारत व रशियाच्या संबंधात ताण आलेला आहे. पण हा ताण आर्थिक व्यवहारापुरताच मर्यादित आहे. भारत व रशियामध्ये रुपया आणि रुबलचा व्यवहार सुरू करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. भारतीय बँकांनी रशियन बँकांनी वोस्त्रो अकाऊंटस्‌‍ उघडलेली आहेत. पण अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी भारतीय बँका अतिसावध भूमिका स्वीकारत आहेत. म्हणूनच या व्यवहाराला विलंब होत असल्याचे राजदूत अलिपोव्ह म्हणाले.

पण अमेरिकेने निर्बंध न लादलेल्या रशियन बँकांच्या मार्फत डॉलर व युरोचा वापर करूनही दोन्ही देशांमधील व्यवहार पूर्ण होऊ शकतात, अशी माहिती रशियन राजदूतांनी यावेळी दिली. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी आत्तापर्यंत वापरल्या जाणाऱ्या स्वीफ्टचा वापर करणे सोपे जाऊ शकते. यासंदर्भात दोन्ही देश एकमेकांना प्रस्ताव देत आहेत, अशी माहिती राजदूत अलिपोव्ह यांनी दिली. दरम्यान, दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना रशियन राजदूतांनी भारताला अमेरिकेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. अमेरिका भारताला अतिप्रगत तंत्रज्ञान पुरविण्यासाठी उत्सुक असून भारताबरोबर प्रगत तंत्रज्ञानाच्या आघाडीवर संयुक्तपणे काम करण्याचीही तयारी अमेरिकेने दाखविली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेच्या नेत्यांनी हे दावे केले होते. त्याचवेळी लोकशाहीवादी देश असलेल्या भारत व अमेरिकेमध्ये धोरणात्मक सहकार्य विकसित करण्यासाठी आपला देश उत्सुक असल्याचे अमेरिका सातत्याने सांगत आहे. मात्र रशियन राजदूतांनी अमेरिकेच्या या दाव्यांवर संशय व्यक्त केला.

भारताला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची ग्वाही देणाऱ्या व धोरणात्मक संबंध विकसित करण्याचे आश्वासन देणाऱ्या अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरच राजदूत अलिपोव्ह यांनी प्रश्न उपस्थित केला. रशिया राजकारण आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवत असल्याचे सांगून भारताबरोबरील रशियाच्या लष्करी आघाडीवरील सहकार्याचे दाखले यावेळी राजदूत अलिपोव्ह यांनी दिले. रशियाने भारताला टी-९० रणगाड्यांची निर्मिती करण्याचा परवाना दिला, ‘सुखोई-३० एमकेआय’ लढाऊ विमानांची निर्मिती व एके-२०३ रायफलींच्या निर्मितीसाठीही रशियाने भारताला तंत्रज्ञान पुरविले होते. तसेच रशियाकडून भारताला एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविली जात असून याची तिसरी बॅटरी देखील भारताला लवकरच मिळेल, असे अलिपोव्ह पुढे म्हणाले. अमेरिकेकडून भारताला अशा स्वरुपाचे सहाय्य मिळणे शक्य नाही, याची जाणीव अलिपोव्ह यांनी याद्वारे करून दिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच अमेरिकेच्या फूट पाडून राज्य करण्याच्या कूटनीतिपासून भारताने सावध रहावे. भारताच्या चीनबरोबरील मतभेदाचा वापर करून अमेरिका त्याचा लाभ उपटू पाहत आहे, असे रशियन राजदूतांनी बजावले आहे.

leave a reply