भारत व चीनमधील बफर स्टेट म्हणून सरदार पटेल यांना स्वतंत्र तिबेट अपेक्षित होता

- संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली – ‘‘देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल दूरदर्शी नेते होते. भारत व चीनमधील ‘बफर स्टेट’ म्हणून तिबेट स्वतंत्र रहावा, अशी अपेक्षा त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती’’, याची आठवण करून देऊन संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारताच्या चीनविषयक भूमिकेत होत असलेल्या लक्षणीय बदलांचे संकेत दिले. जेव्हा जेव्हा भारताने आपल्या सैन्यशक्तीकडे दुर्लक्ष केले, तेव्हा परकीय शक्तींचा याचा लाभ उचलला असे सांगून संरक्षणदलप्रमुखांनी १९६२ साली चीनने केलेल्या आक्रमणाचा दाखला दिला.

भारत व चीनमधील बफर स्टेट म्हणून सरदार पटेल यांना स्वतंत्र तिबेट अपेक्षित होता - संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावतसरदार पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑल इंडिया रेडिओने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संरक्षणदलप्रमुख जनरल रावत बोलत होते. सरदार पटेल यांच्या दूरदर्शित्त्वाची साक्ष त्यांनी तिबेटबाबत व्यक्त केलेल्या अपेक्षेतून व्यक्त झाली, असे जनरल रावत यावेळी म्हणाले. भारत व चीनमध्ये असलेला तिबेट स्वतंत्र रहावा, यामुळे भारत अधिक सुरक्षित राहिल, असे सरदार पटेल यांनी पंडित नेहरू यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. ५० च्या दशकात सरदार पटेल यांनी व्यक्त केलेल्या या विचारांचे महत्त्व पुढच्या काळात स्पष्ट झाले. जेव्हा जेव्हा देशाच्या सैन्यशक्तीकड दुर्लक्ष झाले, तेव्हा तेव्हा त्याचा परकीय शक्तींनी लाभ उचलला. १९६२ साली चीनने केलेल्या आक्रमणामुळे ही बाब नव्याने समोर आली’, असे सांगून जनरल रावत यांनी चीनच्या विश्‍वासघातकी व विस्तारवादी धोरणांवर प्रकाश टाकला.

६२ सालच्या युद्धानंतरही भारतीय सैन्य व चीनच्या लष्करामध्ये चकमकी झडल्या. १९६७ साली सिक्कीमच्या नथूला पास, १९८६ साली तवांगच्या वांगडूग, २०१७ साली डोकलाम मध्ये भारत व नुकतेच लडाखमध्येही चीनचे सैन्य एकमेकांना भिडले होते. १९६२ साली बेसावध असलेल्या भारतावर हल्ला चढवून चीनला मिळालेल्या आत्मविश्‍वासाचा हा परिणाम असल्याचे जनरल रावत यांनी लक्षात आणून दिले. यानंतर भारतीय संरक्षणदल सतर्क असल्याचे सांगून देशाच्या रक्षणाबाबत संरक्षणदलांनी स्वीकारलेल्या सावध भूमिकेची माहिती जनरल रावत यांनी दिली.

चीन व पाकिस्तानकडून संभवणार्‍या धोक्याबाबत भारतीय संरक्षणदल अतिशय सावध आहेत, असे जनरल रावत पुढे म्हणाले. चीन व पाकिस्तानला आपल्या क्षेत्राचा विस्तार करण्याच्या महत्त्वाकंक्षा आहेत आणि त्याविरोधात भारताच्या संरक्षणदलांना सावध रहावेच लागते, असे सांगून जनरल रावत यांनी चीन व पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला. केवळ भूसीमाच नाही तर सागरी क्षेत्रातही संरक्षणदलांनी सावधानता बाळगलेली आहे, असे जनरल रावत पुढे म्हणाले.

जनरल रावत यांची ही लक्षवेधी विधाने प्रसिद्ध होत असतानाच, भारतीय लष्कराने पूर्व लडाखच्या क्षेत्रात विशेष युद्धसराव केल्याची बातमी येत आहे. हिवाळा सुरू होत असताना, एलएसीवर अधिक काळ वास्तव्याची तयारी करीत असताना, भारतीय लष्कराने हा सराव करून चीनला आणखी एक इशार दिल्याचे दिसत आहे. केवळ लडाखच नाही तर अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळही भारतीय लष्कर सराव करीत असल्याचे याआधी उघड झाले होते.

leave a reply