अमेरिका इंधनाच्या दरात करीत असलेल्या हस्तक्षेपावर सौदी अरेबियाचे टीकास्त्र

रियाध/वॉशिंग्टन – आणीबाणीच्या काळासाठी राखीव ठेवलेले इंधनसाठे संपले तर येणाऱ्या काळात संबंधित देशांना कठीण संकटांचा सामना करावा लागू शकतो, असा सज्जड इशारा सौदी अरेबियाचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांनी दिला. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ मोकळे करण्याबाबत स्वीकारलेल्या धोरणावरही टीकास्त्र सोडले. ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ इंधनाचे दर कमी करण्यासाठी नाही तर इंधनाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर करण्यासाठी वापरण्यात येतो, याची आठवण सौदीच्या मंत्र्यांनी अमेरिकेला करून दिली.

Saudi Arabia's criticismइंधनउत्पादक देशांचा गट असणाऱ्या ‘ओपेक प्लस’ने नोव्हेंबर महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन दोन कोटी बॅरल्सची घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर अमेरिकेसह युरोपिय देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासह संसद सदस्यांनी सौदी अरेबियाने रशियाच्या बाजूने निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. अमेरिकेने सौदीतील लष्करी तैनाती मागे घ्यावी तसेच संरक्षण सहकार्य तोडावे, अशी मागणीही अमेरिकी संसदेचे काही सदस्य करीत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना सौदीने उत्पादनातील कपात राजकीय नाही तर आर्थिक निर्णय आहे, असे सांगून संभाव्य जागतिक मंदीच्या संकटाची जाणीवही करून दिली होती.

fuel pricesमात्र अमेरिकेत सौदीबद्दल असणारी नाराजी अजून कायम आहे. त्याचवेळी सौदीनेही आपल्या भूमिकेपासून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उलट अमेरिकेसह मित्रदेशांकडून आपत्कालिन इंधनसाठे मोकळे करण्याबाबत स्वीकारण्यात आलेल्या धोरणाला सौदीने लक्ष्य केले. अमेरिका व मित्रदेशांनी हेच धोरण कायम ठेवल्यास भविष्यात त्यांना अधिक खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते, असे सौदी अरेबियाचे इंधनमंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांनी बजावले. सौदीचा हा इशारा भविष्यात पुन्हा उत्पादनात कपात होण्याचे संकेत देणारा असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेने आपल्या ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’मधील १८ कोटी बॅरल्स इतके कच्चे तेल वापरले आहे. त्यानंतर पुन्हा दीड कोटी बॅरल्स इंधनसाठा मोकळा करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेचा आपत्कालिन इंधनसाठा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भविष्यात इंधनउत्पादक देशांनी कपातीचा निर्णय घेतल्यास हा साठा पूर्वीच्या पातळीवर आणणे अमेरिकेसाठी अवघड बाब ठरु शकते. अमेरिकेबरोबरच इतर मित्रदेशांनाही राखीव इंधनसाठे पूर्ववत करणे सहज सोपे ठरणार नाही, याची जाणीव सौदीच्या इंधनमंत्र्यांनी करून दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ओपेक प्लसने घेतलेल्या इंधनकपातीच्या निर्णयापूर्वी अमेरिका व सौदी अरेबियात ‘सिक्रेट डील’ झाले होते, मात्र सौदीने ते पाळले नाही अशी माहिती उघड झाली आहे. अमेरिकेतील ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सौदीबरोबरील डील निश्चित झाल्यानेच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सौदीचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली होती, असे अमेरिकी दैनिकाने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

leave a reply