इराण-तुर्कीचा प्रभाव रोखण्यावर सौदी-बाहरिनचे एकमत

मनामा – आखाती आणि अरब देशांमधील इराणचा हस्तक्षेप आणि तुर्कीचा विस्तारवाद कमी करण्यासाठी सौदी अरेबिया आणि बाहरिन संयुक्तरित्या प्रयत्न करणार आहेत. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली. इराक, सिरिया तसेच पर्शियन आखातात इराण व तुर्कीच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर, सौदी व बाहरिनमध्ये हे सहकार्य प्रस्थापित झाल्याचे दिसत आहे.

सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी तीन दिवसांपूर्वी बाहरिनचा दौरा केला होता. यावेळी प्रिन्स फैझल यांनी बाहरिनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद यांची भेट घेतली. रिफा अल-झहीर पॅलेसमध्ये झालेल्या या बैठकीत क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या बैठकीतच अरब व आखाती देशांमधील इराणचा वाढता प्रभाव आणि तुर्कीचे विस्तारवादी धोरण रोखण्यासाठी एकजुटीने पावले उचलण्यावर एकमत झाले.

‘उभय देशांच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांना समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच दहशतवादासारख्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आणि हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी सौदी व बाहरिनला एकत्र यावेच लागेल’, असे बाहरिनचे क्राऊन प्रिन्स सलमान म्हणाले. सौदी व बाहरिनमधील ऐतिहासिक संबंधांचा दाखला क्राऊन प्रिन्स सलमान यांनी यावेळी दिला.

सौदी व बाहरिनची सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी हे सहकार्य आवश्यक आहे. द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर भूमिका घेण्यासाठी देखील या सहकार्याचा लाभ होऊ शकतो, यावर सौदी व बाहरिनच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता झाल्याचे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. यानंतर सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बाहरिनचे परराष्ट्रमंत्री अब्दुललतिफ अल-झयानी यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापित झालेल्या ‘सौदी-बाहरिनी कोऑर्डिनेशन काऊन्सिल’ अंतर्गत ही चर्चा पार पडली.

आखाती-अरब देशांमधील इराणच्या हस्तक्षेपावर सौदीने याआधीही चिंता व्यक्त केली आहे. इराक, सिरिया, लेबेनॉन, येमेन तसेच पॅलेस्टाईनमध्ये इराण आपला प्रभाव वाढवित आहे. इराणसंलग्न दहशतवादी संघटना इराक, येमेनमधून आपल्या सुरक्षेला आव्हान देत असल्याचा आरोप सौदी करीत आहे. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या मुद्यावर सौदी आणि इराकमध्ये नुकतीच बैठक पार पडली. याशिवाय जगभरातील अरब-इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तुर्कीबरोबरील सौदीच्या संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

तर इस्रायलबरोबर अब्राहम करार करून सहकार्य प्रस्थापित करणार्‍या बाहरिनवर इराण आणि तुर्कीने जोरदार टीका केली होती. या दोन्ही देशांनी इस्रायलबरोबरच्या सहकार्याचे बाहरिनला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, सौदी व बाहरिनच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीचे महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply