सौदीचा तुर्कीवर अघोषित व्यापारी बहिष्कार

- लंडनस्थित वृत्तसंस्थेचा दावा

रियाध – तुर्कीबरोबर कुठल्याही प्रकारचा व्यापार करू नये, असे आदेश सौदी अरेबियाने स्थानिक व्यापारी गटाला दिले आहेत. त्याचबरोबर सौदीकडून तुर्कीच्या मालवाहू ट्रक्सची सीमेवर अडवणूक केली जात आहे. तुर्कीवर आर्थिक दडपण वाढविण्यासाठी सौदीने या हालचाली सुरू केल्याचा दावा लंडनस्थित वृत्तसंस्थेने केला. गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीचा बहि़ष्कार टाकण्यासाठी सौदीकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सौदीचा तुर्कीवर छुपा व्यापारी बहिष्कारफळे, भाजीपाला घेऊन सीमेवर दाखल होणारे मालवाहू ट्रक्स, कंटेनर्स आणि वाहनांना सौदीच्या सीमेत प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार तुर्कीचे अधिकारी करीत आहेत. तुर्कीच्या मालवाहू वाहनांवर त्याचबरोबर ’मेड इन तुर्की’चा शिक्का असलेल्या मालावर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप या अधिकार्‍यांनी केल्याचे लंडनस्थित वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तुर्कीच्या व्यापारमंत्र्यांनी याबाबत सौदी अरेबियाच्या व्यापारमंत्र्यांशी चर्चा देखील केली. पण सौदीच्या या छुप्या व्यापारी बहि़ष्कारावर परिणाम झाला नसल्याची टीका हे अधिकारी करीत आहेत.

तर सौदीचे सरकारी अधिकारीच व्यापारीवर्गाशी संपर्क करून तुर्कीच्या कंपन्यांशी कुठल्याही प्रकारचे सहकार्य ठेवू नका, असे बजावित असल्याचा दावा तुर्कीतील “दुनिया” या वर्तमानपत्राने केला आहे. सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही सौदीने दिल्याचे तुर्कीच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. सौदीने अधिकृत स्तरावर तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकला तर ते जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन ठरुन सौदीवर निर्बंधांची कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर तुर्की सौदीकडून नुकसानभरपाई देखील घेऊ शकतो. म्हणूनच सौदी तुर्कीवर छुपा बहिष्कार टाकत असल्याचा आरोप तुर्कीच्या वर्तमानपत्राने केला.

तुर्कीच्या मालाबरोबरच सौदीमध्ये बड्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या तुर्कीच्या नागरिकांवरही सौदीचे सरकार कारवाई करीत असल्याचा ठपका या वर्तमानपत्राने ठेवला. तर सौदीच्या अभ्यासक्रमातही “ऑटोमन साम्राज्या”चा उल्लेख काढून “ऑटोमन वर्चस्ववाद” असा बदल केला. तसेच राजधानी रियाधमध्ये ऑटोमन सुल्तान सुलेमान यांचे दिलेले नावही बदलण्यात आले होते. सौदीच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्यांनी देखील उघडपणे तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्वीकारली होती.

सौदीचा तुर्कीवर छुपा व्यापारी बहिष्कार२०१८ साली तुर्कीमध्ये पत्रकार जमाल खशोगीच्या झालेल्या हत्येनंतर सौदी आणि तुर्कीमधील तणाव वाढल्याचा दावा केला जातो. खशोगीच्या हत्येसाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जबाबदार असल्याचा आरोप तुर्कीने केला होता. तेव्हापासून सौदीने तुर्कीकडून केल्या जाणार्‍या आयातीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केल्याचे लंडनस्थित वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तुर्कीच्या सरकारी तसेच खासगी कंपन्यांना देखील सौदीत गुंतवणूक नाकारली जात असल्याचे बोलले जाते. पण सौदी व तुर्कीतील या अघोषित तणावामागे खशोगीची हत्या हे एकमेव कारण नसल्याचे आखातातील काही माध्यमांचे म्हणणे आहे.

काही वर्षांपूर्वी आखातात अरब देश विरोधात इराण-कतार असा वाद पेटलेला असताना तुर्कीने कतारची बाजू उचलून धरली होती. येमेनच्या संघर्षातही तुर्कीने इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांची बाजू घेतली होती. तर सिरियातील संघर्षातही तुर्कीने अमेरिका, नाटो व अरब देशांच्या विरोधात कट्टरपंथियांचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर लिबियातील संघर्षातही तुर्कीने सौदी व अरब देशांचे समर्थन असलेल्या हफ्तार बंडखोरांविरोधात भूमिका घेतली आहे. लिबियातील संघर्षात तुर्कीने इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांना धमकाविल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे सौदीबरोबरच इतर अरब देश देखील तुर्कीच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे.

leave a reply