वर्षभरात सौदी-इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित होईल

- इस्रायलच्या माजी राजदूतांचा दावा

सौदी-इस्रायलरोम – बेंजामिन नेत्यान्याहू पंतप्रधान असताना 2020 साली इस्रायलने चार अरब देशांबरोबर अब्राहम करार केला होता. त्यानंतर कुठलाही नवा देश या करारात सामील झालेला नाही. पण लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नेत्यान्याहू इतर अरब देशांना अब्राहम करारात सहभागी करण्याला प्राथमिकता देतील. वर्षभरात इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये अब्राहम करार पार पडेल’, असा दावा इस्रायलचे माजी राजदूत डॅनी डॅनन यांनी केला.

युएई, बाहरिन या आखाती देशांप्रमाणे लवकरच सौदी अरेबिया देखील इस्रायलबरोबर अब्राहम करार करील, असे सांगणाऱ्या बातम्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत चालले आहे. सौदीच्या मान्यतेशिवाय युएई व बाहरिन यांनी इस्रायलसह हा करार केलाच नसता. त्यामुळे सौदी देखील या कराराच्या बाजूने असल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका मुलाखतीत इस्रायलशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

सौदी-इस्रायलपण इस्रायलमधील लॅपिड यांचे सरकार आणि अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने अब्राहम करारात सौदी किंवा इतर अरब देशांना सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका इस्रायलचे माजी राजदूत डॅनी डॅनन यांनी थेट उल्लेख टाळून केली. मात्र पुढच्या वर्षी इस्रायल आणि सौदीमध्ये असे सहकार्य प्रस्थापित होईल, असा विश्वास डॅनन यांनी ‘अब्राहम अकॉर्ड्‌‍स ग्लोबल लिडरशीप समीट’मध्ये बोलताना व्यक्त केला. बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यासाठी हालचाली सुरू होतील, अशी माहिती डॅनन यांनी दिली.

नेत्यान्याहू पहिल्या परदेश दौऱ्यासाठी युएईची निवड करतील. त्यानंतर नेत्यान्याहू सौदीला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा डॅनन यांनी केला. ‘अब्राहम करार एका दिवसात उभा राहिलेला नसून यासाठी कित्येक महिन्यांची तयारी करावी लागली. त्याचप्रमाणे गेली काही वर्षे इस्रायलने सौदीबरोबर संपर्क प्रस्थापित केला असून लवकरच याचे परिणाम दिसू लागतील. दोन्ही देशांच्या नेत्यांनी पडछायेतून बाहेर पडून धाडसी निर्णय घेतले तर अब्राहमच्या सर्व लेकरांमध्ये शांती प्रस्थापित होईल’, असे डॅनन पुढे म्हणाले. यावेळी डॅनन यांनी काही पाश्चिमात्य तसेच अरब नेत्यांची भेट घेतली.

दरम्यान, इराणमधील आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीचे विरोधक आणि परदेशात आश्रय घेणाऱ्या इराणच्या नेत्यांनी देखील इस्रायलबरोबर अब्राहम करारात सामील होण्याची तयारी दाखविली. 1979 सालच्या इस्लामी क्रांतीच्या आधी इराणचे इस्रायलबरोबर सहकार्य होते, याची आठवण या इराणी नेत्यांनी करून दिली.

हिंदी

leave a reply