हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांमध्ये सौदीचे नागरिक व येमेनींचा बळी

- सौदीवरील हल्ले तीव्र करण्याची हौथींची धमकी

हौथी बंडखोरसना/रियाध – येमेनमधील हौथी बंडखोरांनी गेल्या २४ तासात सौदी अरेबिया व येमेनच्या मरिब प्रांतात चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सहा नागरिकांचा बळी गेला. यामध्ये सौदीच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. यापुढेही सौदीवरील आपले रॉकेट व क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू राहतील, अशी धमकी हौथी बंडखोरांनी दिली. तर सौदी व येमेनी नागरिकांचा बळी घेणार्‍या हौथी बंडखोरांच्या या कारवाईवर जगभरातून टीका होत आहे. रविवारी सकाळी सौदी व अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हल्ला चढवून हौथी बंडखोरांच्या शस्त्रास्त्रांचा मोठा साठा नष्ट केल्याची माहिती दिली.

हौथी बंडखोरांनी शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील जिझान प्रांतात तीन क्षेपणास्त्रे डागली. येथील समताह शहरात एका दुकानावर कोसळलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात दोन जणांचा बळी गेला तर सात जखमी झाले. हौथी बंडखोरांचा प्रवक्त ब्रिगेडिअर जनरल याह्या सरीए याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच यापुढेही सौदी व अरब मित्रदेशांच्या लष्कराने हौथींवरील हल्ले सुरू ठेवले तर याहून भीषण हल्ले चढविण्याची धमकी सरीए याने दिली.

पुढच्या काही तासात हौथी बंडखोरांनी येमेनच्याच मरिब प्रांतातील अल जुबाह भागात क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला. यामध्ये चार स्थानिकांचा बळी गेला तर सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. या दोन्ही हल्ल्यांचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत.

सौदीची राजधानी रियाधमधील अमेरिकेच्या दूतावासाने हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांवर सडकून टीका केली. ‘हौथी बंडखोरांचे हल्ले गृहयुद्ध लांबवणारे ठरत असून यामुळे सौदी तसेच येमेनमधील नागरिकांचा जीवही धोक्यात आला आहे. त्याचबरोबर सौदीमधील ७० हजार अमेरिकी नागरिकांची सुरक्षाही यामुळे धोक्यात आली आहे’, अशी टीका अमेरिकेच्या दूतावासाने केली. युएई, बाहरिन, कुवैत, इजिप्त, जॉर्डन या सौदीच्या अरब मित्रदेशांनीही हौथी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले.

हौथी बंडखोरया हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल सौदी व अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने रविवारी सकाळी येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. यामध्ये हौथी बंडखोरांचा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा नष्ट केल्याचा दावा सौदीने केला. गेल्या आठवड्यातही सौदीने येमेनच्या राजधानी सनामधील हौथी बंडखोरांचा लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता.

दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून येमेनमधील सौदी अरेबिया समर्थक हादी सरकार आणि हौथी बंडखोरांमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे. यामध्ये दोन लाख, ३३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून लाखोजण विस्थापित झाले आहेत. अकरा महिन्यांपूर्वी हौथी बंडखोरांनी मरिब या इंधनसंपन्न प्रांताच्या ताब्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत.

पाच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, हौथी बंडखोरांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२१ साली सौदी व येमेनी लष्करावरील हल्ले दुपटीने वाढविले आहेत. हौथी बंडखोरांच्या या हल्ल्यांमागे इराण असल्याचा दावा केला जातो. हे इराण व सौदीमधील अप्रत्यक्ष युद्ध पुढच्या काळात अधिकाधिक तीव्र होत जाईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply