दहशतवादी गटांशी जोडलेल्या ७७१ जणांवर तुर्कीची कारवाई

- अमेरिकी गट व पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश

दहशतवादी गटांशीअंकारा – तुर्कीने दहशतवादी गटांशी संपर्कात असलेल्या किंवा त्यांना आर्थिक सहाय्य करणार्‍या ७७१ जणांची खाती गोठविली आहेत. तुर्कीच्या कोषागार आणि अर्थ मंत्रालयाने ही कारवाई केली. यामध्ये अमेरिकन संस्थेबरोबरच तुर्कीला आपला सर्वात जवळपचा मित्रदेश म्हणविणार्‍या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे. तुर्कीच्या यंत्रणांनी ही माहिती उघड केली.

तुर्कीचे अर्थमंत्री नुरेद्दीन नेबाती आणि अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलू यांनी ७७१ जणांवर कारवाईचे आदेश दिले. यामध्ये राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या राजवटीविरोधात बंड पुकारणार्‍या ‘गुलेन मुव्हमेंट’मध्ये सहभागी असलेल्या ४५४ जणांचा समावेश आहे. २०१६ साली अमेरिकास्थित फैतुल्ला गुलेन या धार्मिक नेत्याने एर्दोगन यांच्या राजवटीविरोधात सशस्त्र बंड पुकारले होते. या बंडात सहभागी झालेल्यांना आर्थिक तसेच इतर सहाय्य पुरविणार्‍या ४५४ समर्थकांवर तुर्कीने ही कारवाई केली.

अमेरिकास्थित ‘नायगारा फाऊंडेशन’ या गटाची संपत्ती देखील गोठविली आहे. सदर संस्था गुलेन गटाशी संबंधित असल्याचा दावा केला जातो. याशिवाय तुर्कीने दहशतवादी घोषित केलेल्या पीकेके या कुर्द बंडखोर संघटनेतील ११९ सदस्यांची खाती गोठविली आहेत. अल कायदा, अल-नुस्र, आयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेबरोबरच हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेच्या सदस्यांचा देखील या यादीत समावेश आहे. दहशतवादाला समर्थन देणार्‍यांमध्ये पाकिस्तानमधील नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

एर्दोगन सरकारच्या या भूमिकेवर पाकिस्तानातील कट्टरपंथिय गट आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुर्की पाकिस्तानविरोधात धोरणे स्वीकारत असल्याची टीका ही कट्टरपंथिय मंडळी करीत आहेत. गेल्या आठवड्यातच तुर्कीने भारताला ड्रोन्स पुरविण्याची तयारी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानची बाजू उचलून धरणारा तुर्की आता पूर्णपणे बदलल्याचे दावे पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत. इस्रायलबाबतची तुर्कीची भूमिका बदलल्याचे दिसत आहे.

leave a reply