गुन्हेगारीचे रॅकेट व हुल्लडबाजीमध्ये गुंतलेल्या पाकिस्तानींमुळे सौदी व तुर्की पाकिस्तानींना व्हिसा नाकारणार

इस्लामाबाद – सौदी अरेबिया ईशनिंदेचा आरोप ठेवून काही पाकिस्तानी नागरिकांवर कायमस्वरुपी प्रवेशबंदीची तयारी केली आहे. तर तुर्की यापुढे पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा देताना कठोर धोरण स्वीकारणार आहे. कधीकाळी आपले मित्रदेश असलेल्या सौदी व तुर्कीच्या निर्णयांमुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. युरोपिय देशांमध्ये पाकिस्तानी बदनाम झाल्याने, या देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना प्रवेश मिळणे आधीच अवघड बनले होते. अशा परिस्थितीत इस्लामी जगतातील प्रमुख देशांनीही पाकिस्तानी नागरिकांबाबत कठोर धोरण स्वीकारल्याने, आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज गेल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत.

व्हिसासलग दुसऱ्या वर्षी पाकिस्तानचा पासपोर्ट जगात 109 व्या स्थानावर कायम आहे. तर जगातील सर्वात वाईट पासपोर्टच्या यादीत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान, इराक आणि सिरियानंतर पाकिस्तानच्या पासपोर्ट सर्वात वाईट ठरविला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीमुळे ही बाब उघड झाली होती. पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार आणि माध्यमांनी या नाचक्कीसाठी नेत्यांना जबाबदार धरले होते.

गेल्या आठवड्यात तुर्की आणि सौदीमध्ये घडलेल्या दोन घटनांमुळे जगभरात पाकिस्तानची लाज निघाल्याचे ताशेरे या देशाच्या माध्यमांनी ओढले आहेत. तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील तक्सिम चौकातून नेपाळच्या चार नागरिकांचे अपहरण झाले. सहा पाकिस्तानी नागरिकांच्या टोळीने हे अपहरण केले आणि त्यांनी नेपाळी नागरिकांच्या सुटकेसाठी 10 हजार युरोची मागणी केली होती.

तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करून पाकिस्तानी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी नेपाळी नागरिकांना अमानवी वागणूक दिल्याचे तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. गुन्हेगारांमध्ये 16 ते 35 वर्ष वयोगटातील पाकिस्तानींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.

नेपाळी नागरिकांच्या अपहरणानंतर पर्यटन, शिक्षण किंवा रोजगारासाठी दाखल होणारे पाकिस्तानी आपल्या देशातील गंभीर गुन्हेगारीत सहभागी असल्याचे तुर्कीच्या माध्यमांनी लक्षात आणून दिले आहे. आठवड्यापूर्वी परदेशातील पाकिस्तानी नागरिकांनी इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरुन काढल्याचा निषेध करण्यासाठी आक्रमक निदर्शने केली होती. तुर्कीच्या यंत्रणेने या निदर्शकांना ताब्यात घेतले होते. तर गेल्या वर्षी आणखी एका पाकिस्तानी टोळीने तुर्कीतील पाकिस्तानींचेच अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी 50 हजार युरोची मागणी केली होती.

पाकिस्तानी नागरिकांच्या तुर्कीतील या गुन्हेगारी कारवाया आता नव्याने समोर येत आहेत. त्यावर तुर्कीची जनता संताप व्यक्त करीत आहे. गेल्या आठवड्यात तुर्कीच्या नागरिकांनी पाकिस्तानींची हकालपट्टी करा, त्यांना तुर्कीत प्रवेश देऊ नका, अशी मागणी करणारा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू केला होता. यानंतर तुर्कीचे सरकार पाकिस्तानींना निवासी परवाने देण्याचे थांबविणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

तुर्कीप्रमाणे सौदी अरेबिया आणि युएई या अरब देशांमध्येही पाकिस्तानींविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदीच्या दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान शरीफ यांनी मदिना येथील प्रार्थनास्थळाला भेट दिली. या ठिकाणी काही पाकिस्तानी नागरिकांनी पंतप्रधान शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

सौदीच्या यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून प्रार्थनास्थळात असे कृत्य करणाऱ्या पाकिस्तानींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. तर त्याआधी युएई, ब्रिटन व काही युरोपिय देशांमध्ये देखील पाकिस्तानींनी हुल्लडबाजीचा प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे गुन्हेगारीचे मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले होते. परदेशात जाऊन चोरी, अपहरण, हल्ले आणि लैंगिक अत्याचारासारख्या भयंकर गुन्ह्यात सहभागी होणाऱ्या या पाकिस्तानींमुळे आपल्या देशाची बदनामी होत असल्याची खंत पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत. तसेच पाकिस्तानी बनावट कागदपत्रे दाखवून अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्ये शिरकाव करीत असल्याचा दावाही पाकिस्तानच्याच माध्यमांनी केला आहे. अशा पाकिस्तानींना ताब्यात घेऊन त्यांना मायदेशी धाडण्याचे सत्र काही देशांनी सुरू केले आहे.

leave a reply