सौदी, युएईच्या ‘ब्रिक्स’मधील सहभागामुळे जागतिक सत्तेचा तोल कायमचा बदलेल

आखातातील विश्लेषकांचा दावा

brics flags दुबई – गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेची डॉलरबाबतची भूमिका यामुळे मित्र व सहकारी देशांनी पर्यायी व्यवस्थेकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्याच्या प्रस्थापित जागतिक व्यवस्थेला समांतर आर्थिक विश्व निर्माण करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’च्या गटात सौदी अरेबिया आणि युएईसारख्या आखाती देशांचा सहभाग ‘गेम चेंजिंग’ ठरेल. यामुळे जागतिक सत्तेचा तोल कायमस्वरुपी बदलेल, असा दावा आखातातील विश्लेषकांनी केला.

जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या उलथापालथींचे संकेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार व विश्लेषक देत आहेत. २००७ पेक्षाही मोठी मंदी जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था देत आहेत. त्यातच बायडेन प्रशासनाने डॉलरबाबत स्वीकारलेले धोरण देखील अमेरिकी तसेच मित्रदेशांच्या चिंता वाढविणारे ठरत आहे. याची जाणीव झालेल्या ब्रिक्समधील देशांनी डॉलरमधील व्यवहार कमी करून पर्यायी चलनात व्यवहार वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

Abu Dhabi's Crown Prince Sheikh Mohammed bin Zayed al-Nahyan receives Saudi Crown Prince Mohammed bin Salman at the Presidential Airport in Abu Dhabiब्रिक्स देशांच्या या भूमिकेला आखातातील अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांचे सहकार्य मिळत आहे. सौदी अरेबिया, युएई व तुर्कीने ब्रिक्सचा सदस्य होण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. पुढच्या वर्षी याबाबतचा निर्णय होणार आहे. असे झाले तर जागतिक व्यवस्थेतील ब्रिक्सचे महत्त्व अधिकच वाढेल, असा दावा आखातातील विश्लेषकांनी केला आहे. यासाठी ब्रिक्स आणि आखाती देशांचे जागतिक अर्थव्यवस्थेतील योगदान याकडे लक्ष वेधले.

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ब्रिक्स देशांचा २३ टक्के इतका हिस्सा आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारात ब्रिक्स देशांचे १८ टक्के इतके योगदान आहे. जगातील ४१ टक्के लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये आहे. जागतिक इंधन उत्पादनापैकी ३१ टक्के इतका साठा सौदी व युएईकडे आहे. युएई हे जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांचे मोठे केंद्र आहे. अशा परिस्थितीत सौदी व युएईचा ब्रिक्समधील सहभाग या संघटनेला अधिक मजबूती देईल आणि जागतिक शक्तीचा तोल बदलेल, असा दावा हे विश्लेषक करीत आहेत.

leave a reply