एर्दोगन सरकारचे तुर्कीतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत

- तुर्कीतील माफिया डॉन सेदात पेकरचा खळबळजनक दावा

अंकारा/दुबई – तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांचे देशातील गुन्हेगारी टोळ्यांशी जवळचे संबंध असल्याचा खळबळजनक आरोप माफिया सेदात पेकर याने केला आहे. तुर्कीचे माजी अंतर्गत सुरक्षामंत्री मेहमत अगर हे देशातील ‘डीप स्टेट’चे प्रमुख असून विरोधी नेते व पत्रकारांच्या हत्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीत या गटाचा हात असल्याचे पेकर याने म्हटले आहे. पेकरच्या आरोपांमुळे एर्दोगन यांच्या राजवटीला जबरदस्त हादरे बसू लागले असून, सत्ताधारी ‘एकेपी पार्टी’ची लोकप्रियता 27 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसते.

एर्दोगन सरकारचे तुर्कीतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत - तुर्कीतील माफिया डॉन सेदात पेकरचा खळबळजनक दावागेल्या काही वर्षात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीवरील आपली पकड घट्ट करण्यासाठी अनेक पावले उचलली होती. हे करताना विरोधकांना पद्धतशीरपणे संपविण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. त्यासाठी एर्दोगन यांचे सरकार सुरक्षायंत्रणांबरोबरच कट्टरपंथी गट तसेच गुन्हेगारी टोळ्यांचे सहाय्य घेत असल्याचेही सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी एर्दोगन यांचा मुलगा तसेच जावई ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या सहाय्याने इंधनाचा व्यापार करीत असल्याची माहितीही प्रसारमाध्यमांमधून समोर आली होती. या पार्श्‍वभूमीवर, गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाने एर्दोगन सरकारमधील नेत्यांविरोधात केलेले आरोप लक्ष वेधून घेणारे ठरतात.

एर्दोगन सरकारचे तुर्कीतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत - तुर्कीतील माफिया डॉन सेदात पेकरचा खळबळजनक दावासेदात पेकर याने ‘यु ट्यूब’वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून एर्दोगन सरकारविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. यात त्याने सरकारमध्ये सध्या अंतर्गत सुरक्षामंत्री असणारे सुलेमान सोयलु, माजी पंतप्रधान बिनाली यिल्दरिम यांचा मुलगा एर्कम, माजी अंतर्गत सुरक्षामंत्री मेहमत अगर, त्यांचा मुलगा व ‘एकेपी पार्टी’चे नेते तोल्गा अगर आणि गुप्तचर यंत्रणेमधील माजी वरिष्ठ अधिकारी कोर्कुत एकन यांची नावे घेतली आहेत. आपण यापुढेही अनेक व्हिडिओ प्रसिद्ध करणार असून त्यातून एर्दोगन सरकारमधील अनेक मंत्री व नेत्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा पेकरने दिला.

एर्दोगन सरकारचे तुर्कीतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहेत - तुर्कीतील माफिया डॉन सेदात पेकरचा खळबळजनक दावा2014 ते 2020 या कालावधीत आपणही एर्दोगन सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांच्या इशार्‍यावर अनेक गुन्हेगारी कृत्ये केली आहेत, याची कबुलीही पेकरने दिली. 2015 साली ‘एकेपी पार्टी’च्या आदेशानंतर एर्दोगन यांच्यावर टीका करणार्‍या ‘हुरियत’ या दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला केला होता, अशी माहितीही गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाने दिली. तुर्कीतील अनेक पत्रकारांच्या हत्येमागे एर्दोगन सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोपही पेकरने केला. माजी पंतप्रधान बिनाली यिल्दरिम यांचा मुलगा एर्कम व्हेनेझुएलातून तुर्कीत येणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्क चालवित असल्याचेही पेकर यांनी म्हटले आहे.

तुर्की सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर आरोप करणार्‍या पेकरने राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्यावर थेट कोणतेही आरोप केलेले नाहीत. व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख ‘ब्रदर तय्यिप’ असा करण्यात आला असून एर्दोगन यांचे निकटवर्तिय त्यांना अंधारात ठेवत असल्याचा दावा पेकरने केला आहे. मात्र पेकरच्या आरोपांचे तीव्र पडसाद तुर्कीमध्ये उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलु यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना स्वतःहून निवेदन देणे भाग पडले आहे. त्यात त्यांनी तुर्की सरकार गुन्हेगारीविरोधात आक्रमक कारवाई करीत असल्याचा दावा केला आहे.

leave a reply