पॅरिस/बमाको – फ्रान्सने मालीत चढविलेल्या हवाईहल्ल्यात उत्तर आफ्रिकेतील अल कायदाचा वरिष्ठ कमांडर बाह अग मुसा ठार झाला आहे. फ्रान्सने गेल्या १० दिवसात मालीत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. फ्रान्सकडून सुरू असणाऱ्या ‘ऑपरेशन बरखाने’अंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईत ‘अल कायदा’चे ५०हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. फ्रान्ससह युरोपमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली सलग दुसरी कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते.
फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी मालीतील कारवाईची माहिती दिली. ‘मालीच्या लष्करासह आंतरराष्ट्रीय फौजांवर अनेक हल्ले करणाऱ्या बाह अग मुसाला ठार करण्यात आले आहे. मुसा साहेल क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी गटांतील महत्त्वाचा नेता होता. त्याचा मृत्यू दहशतवादविरोधी मिळालेले मोठे यश आहे’, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री पार्ली यांनी सांगितले. मालीच्या मेनाका प्रांतात केलेल्या या कारवाईत ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स व कमांडो पथकाने भाग घेतल्याचे फ्रेंच लष्कराचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बरब्रय यांनी स्पष्ट केले. मुसावर केलेल्या कारवाईत चार इतर दहशतवादीही मारले गेल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली.
मालीतील दहशतवादी संघटना ‘जेएनआयएम’चा प्रमुख इयाद अग घालीचा जवळचा साथीदार असणारा मुसा अमेरिकेच्या ‘टेररिझम लिस्ट’मध्ये होता. २०१२ साली मालीत ‘तुआरेग’ बंडखोरांनी केलेल्या उठावात मुसाचा सहभाग होता. अल कायदाशी संलग्न असणाऱ्या मुसाने मालीसह साहेल क्षेत्रातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगण्यात येते.
गेल्या काही वर्षांपासून पश्चिम आफ्रिकेच्या ‘साहेल’ भागात दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. ‘आयएस’ आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांनी माली, नायजर, बुर्किना फासो आणि नायजेरियाच्या सैन्यावर जोरदार हल्ले करण्यास सुरवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. या संघर्षात साहेल क्षेत्रात तैनात असणाऱ्या फ्रेंच लष्करानेही आपले अनेक जवान गमावले आहेत. त्यामुळे फ्रान्सदेखील आक्रमक झाला असून, गेल्या काही महिन्यांत दहशतवादविरोधी मोहिमांची गती वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अतिरिक्त लष्करी तैनातीची घोषणाही केली होती. सध्या मालीसह ‘साहेल’ क्षेत्रात फ्रान्सकडून सुरू असणाऱ्या ‘ऑपरेशन बरखाने’अंतर्गत पाच हजारांहून अधिक जवान तैनात आहेत.