जेरूसलेममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सात इस्रायलींचा बळी

israel netanyahuजेरूसलेम – इस्रायलच्या जेरूसलेम शहरातील प्रार्थनास्थळात दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात सात ज्यूधर्मियांचा बळी गेला. त्यानंतर गेल्या काही तासात जेरूसलेममध्ये इस्रायली नागरिकांवर दोन ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी या हल्ल्यांचे स्वागत केले. तसेच इस्रायली पोलिसांनी जेनिन शहरात केलेल्या कारवाईला हे प्रत्युत्तर असल्याचे या दहशतवादी संघटनांनी म्हटले आहे. यानंतर वेस्ट बँक आणि गाझापट्टीतील कट्टरपंथियांनी रस्त्यावर फटाके फोडून तसेच मिठाई वाटून या हल्ल्यांचा जल्लोष केला. तर या भ्याड हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला आहे.

israel synagogue attackगुरुवारी वेस्ट बँकच्या जेनिन शहरात निर्वासितांसाठी उभारलेल्या शिबिरात दहशतवादी आणि इस्रायली सुरक्षा जवानांमध्ये संघर्ष भडकला होता. सुरुवातीला इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी पॅलेस्टिनी निर्वासितांवर गोळीबार केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हे निर्वासित निरपराध होते, असे पॅलेस्टाईनचे नेते व काही वृत्तसंस्था सांगत आहेत. पण गेल्या चोवीस तासात जेनिन शहरातील संघर्षाचे व्हिडिओ समोर आले व यात मास्क लावलेले आणि प्रगत रायफल्स वापरणारे दहशतवादी इस्रायली जवानांवर गोळीबार करताना दिसत आहेत. इस्रायली लष्कराच्या कारवाईत दहशतवादी मारला गेल्याचेही यातून उघड झाल्याचे दिसते. हमासने गाझातून चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांना उत्तर म्हणून केलेल्या हवाई हल्ल्यांचे व्हिडिओज्‌‍ही इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केले आहेत.

israel synagogue attack celebrationयाला काही तास उलटत नाही तोच शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पूर्व जेरूसलेमच्या नेवे याकोव्ह भागातील ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळात दहशतवाद्याने बेछूट गोळीबार केला. २१ वर्षीय दहशतवाद्याने चढविलेल्या या हल्ल्यात बळी गेलेल्यांमध्ये १४ वर्षाच्या मुलासह ७० वर्षाच्या वयोवृद्धाचा देखील समावेश आहे. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करून या दहशतवाद्याला ठार केले. इस्रायली प्रार्थनास्थळावरील हल्ल्याची माहिती मिळताच वेस्ट बँकच्या रामल्ला, नेब्लस, जेनिन, हेब्रॉन व पूर्व जेरूसलेममधील काही भागात पॅलेस्टाईनच्या काही कट्टरपंथियांनी फटाके फोडून जल्लोष केला. वेस्ट बँक तसेच गाझातील काही ठिकाणी मिठाई वाटण्यात आली. प्रार्थनास्थळात बळी गेलेल्यांमध्ये युक्रेनी नागरिकाचाही समावेश असल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी प्रार्थनास्थळावरील हल्ल्याप्रकरणी ४२ जणांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेरूसलेममधील आणखी दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. इस्रायलमधील ऐतिहासिक शहर ‘सिटी ऑफ डेव्हिड’मध्ये १३ वर्षाच्या मुलाने गोळीबार करून दोन इस्रायली नागरिकांना गंभीररित्या जखमी झाले. त्याआधी जेरूसलेममधील आर्मेनियन रेस्टॉरंटवर काही माथेफिरू पॅलेस्टिनींनी हल्ला चढविला होता.

जेरूसलेममधील हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. भारत, रशिया, युएई या देशांनी या हल्ल्यांची कठोर शब्दात निर्भत्सना केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि पोलीस मंत्री बेन ग्वीर यांनी घटनास्थळांची पाहणी केली. या हल्ल्यामागे असलेल्यांवर त्वरित कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिली आहे. जेनिन शहरातील संघर्ष व गाझातून झालेले रॉकेट हल्ले म्हणजे नेत्यान्याहू यांच्या सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. पॅलेस्टिनींच्या विरोधात इस्रायलच्या नेत्यान्याहू सरकारने आक्रमक धोरण स्वीकारू नये, यासाठी अमेरिका व युरोपिय देश दबाव टाकत आहेत. या आक्रमक धोरणांमुळेच इस्रायलचा पॅलेस्टाईनशी रक्तरंजित संघर्ष पेट घेईल, असे इशारे अमेरिकेकडून दिले जात आहेत. मात्र इतर देशांच्या दबावाला बळी पडून इस्रायल आपले धोरण बदलणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी याआधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे जेरूसलेममधील हल्ल्यावर इस्रायलकडून येणाऱ्या प्रतिक्रियेकडे विश्लेषकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

leave a reply