‘सीआयए’चे प्रमुख इस्रायल, पॅलेस्टाईनच्या दौऱ्यावर

तेल अविव – अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स हे इस्रायल आणि वेस्ट बँकच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल आणि वेस्ट बँकमध्ये संघर्ष पेटलेला असताना सीआयएचे प्रमुख याच भागात होते, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर येत्या काही तासात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकनदेखील इस्रायल व वेस्ट बँकमध्ये दाखल होणार आहेत.

US Turkeyसीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. लिबिया व त्यानंतर इजिप्तचा दौरा करून बर्न्स यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतली होती. पुढच्या काही तासात सीआयएचे प्रमुख इस्रायलच्या तेल अविवमध्ये दाखल झाले. त्याच दिवशी वेस्ट बँकच्या जेनिन शहरात इस्रायली सुरक्षा यंत्रणा आणि इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष भडकला, याची आठवण इस्रायलच्या वृत्तसंस्थेने केली. यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले झाले होते.

इस्रायलच्या दौऱ्यानंतर सीआयएच्या प्रमुखांनी वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. बर्न्स यांच्या इस्रायल व वेस्ट बँकमधील भेटींचे तपशील समोर आलेले नाहीत. पण पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी जेनिनमधील संघर्षासाठी इस्रायलला जबाबदार धरून गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रायली सुरक्षा यंत्रणेबरोबरच्या सहकार्यातून माघार घेतली. इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.

वेस्ट बँकमधील दहशतवाद रोखण्यासाठी इस्रायली व पॅलेस्टिनी सुरक्षा यंत्रणांमधील सहकार्य आवश्यक होते. पण अब्बास यांच्या या निर्णयानंतर वेस्ट बँकमधील सुरक्षेचा प्रश्न अधिकच अवघड होणार असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायली तसेच पॅलेस्टिनींच्याही सुरक्षेसाठी सदर सहकार्य आवश्यक होते, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, इस्रायलच्या जेरूसलेममधील दहशतवादी हल्ल्याची दखल अमेरिकेने घेतली आहे. यानंतरही परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन इस्रायल व त्यानंतर वेस्ट बँकचा दौरा करणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, इस्रायलच्या दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री इस्रायलवरील दडपण अधिकच वाढविणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सीआयएच्या प्रमुखांची इस्रायल व पॅलेस्टाईन भेट याची साक्ष देत आहे. इस्रायलमध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या नव्या सरकारला पॅलेस्टाईनबाबत मनमानी करू देणार नाही, असा इशारा इस्रायलमधील अमेरिकेच्या राजदूतांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता. त्यानंतर अमेरिकेकडून सातत्याने अशा स्वरुपाचे इशारे इस्रायलच्या सरकारला दिले जात आहेत. अशा परिस्थितीत परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्या इस्रायल दौऱ्याला फार मोठे महत्त्व आल्याचे दिसत आहे.

leave a reply