लष्करी सरावाचे कारण पुढे करीत चीनच्या ७१ विमानांसह सात युद्धनौकांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी असल्याचा तैवानचा दावा

Seven warshipsतैपेई/बीजिंग – अमेरिका व तैवान चिथावणीखोर कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवत चीनने रविवारी अचानक संरक्षण सरावाचे आयोजन केले. या सरावाचे कारण पुढे करुन चीनची तब्बल ७१ लढाऊ व टेहळणी विमाने तसेच सात युद्धनौकांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. चीनने २४ तासांच्या अवधीत केलेली ही सर्वात मोठी घुसखोरी असल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या या घुसखोरीवर अमेरिका व जपानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

china-taiwan-drillगेल्या काही महिन्यात चीनकडून तैवानवरील आक्रमणाची शक्यता वाढल्याचे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन अधिक आक्रमक झाला असून २०२३ सालीच चीन तैवानवर हल्ला चढवेल, असा दावा काही विश्लेषक करीत आहेत. गेल्या काही दिवसात चीनने तैवानच्या हद्दीत पुन्हा मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू केल्याने या दाव्याला दुजोरा मिळत आहे. रविवारची घुसखोरी ही चीनने २४ तासात तैवानच्या हद्दीत केलेली सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. यादरम्यान चीनने आपल्या ७१ लढाऊ व टेहळणी विमानांना तसेच सात युद्धनौकांना दोन देशांच्या सीमेचा भाग असणारी ‘मेडिअन लाईन’ ओलांडून पुढे पाठविल्याचे उघड झाले. यावेळी चीनच्या विमानांनी तैवानमधील ‘सेंट्रल माऊंटन रेंज’चे फोटोग्राफ्स काढून ते सोशल मीडियावर प्रसिद्धही केले आहेत. चीनने आपल्या घुसखोरीचे समर्थन करताना हा ‘स्ट्राईक ड्रिल्स’चा भाग होता, असा दावा केला आहे.

चीनची घुसखोरी ही मोठी चिथावणी असल्याचा आरोप तैवान सरकारने केला आहे. अमेरिका व जपाननेही चीनच्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे. चीनची ही घुसखोरी अमेरिका व जपानने जाहीर केलेल्या व्यापक संरक्षणखर्चावर उमटलेली प्रतिक्रिया असल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत. या दोन्ही देशांनी पुढील काळात चीनविरोधातील संरक्षणसज्जतेसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी तसेच तैनाती करण्याचे इरादे जाहीर केले आहेत.

leave a reply