‘आयएमएफ’ व ‘वर्ल्ड बँके’च्या सहाय्याने सिंगापूरचे ‘डिजिटल करन्सी’ विकसित करण्याचे संकेत

‘वर्ल्ड बँके’सिंगापूर – सिंगापूरची मध्यवर्ती बँक ‘मॉनेटरी ऑथेरिटी ऑफ सिंगापूर’ने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व ‘वर्ल्ड बँके’सह इतर यंत्रणांच्या सहकार्याने ‘डिजिटल करन्सी’ विकसित करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून सिंगापूरच्या मध्यवर्ती बँकेने ‘ग्लोबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी चॅलेंज’ नावाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याची घोषणा केली. यात जगभरातील वित्तसंस्था, ‘फिन्टेक’ क्षेत्रातील कंपन्या व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांनी ‘डिजिटल करन्सी’ची निर्मिती व अंमलबजावणी संदर्भातील संकल्पना सादर कराव्यात, असे सिंगापूरच्या मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहारांची मध्यवर्ती यंत्रणा म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘स्विफ्ट’ने गेल्या महिन्यात डिजिटल करन्सीसंदर्भात एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात जगभरातील ५० टक्क्यांहून अधिक मध्यवती बँका ‘डिजिटल करन्सी’ सुरू करण्यासंदर्भात हालचाली करीत असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणार्‍या चीन व ब्रिटनसारख्या देशांकडून ‘क्रिप्टोकरन्सी’विरोधात आक्रमक कारवाई सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंगापूरच्या मध्यवर्ती बँकेने जगभरातील प्रमुख यंत्रणांना बरोबर घेऊन ‘डिजिटल करन्सी’साठी पावले उचलणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘वर्ल्ड बँके’सिंगापूरच्या मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, नाणेनिधी व वर्ल्ड बँकेबरोबरच ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’, ‘युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड’, ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’, ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट’ या यंत्रणाही ‘डिजिटल करन्सी’शी निगडित मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त ‘ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस’ व ‘मास्टरकार्ड’सारख्या कंपन्याही सहाय्य पुरविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत एक ‘१२ प्रॉब्लेम स्टेटमेंट’ प्रसिद्ध करण्यात आले असून ‘डिजिटल करन्सी’चा प्रस्ताव देणार्‍या कंपन्यांना त्या आधारावर संकल्पना सादर करायची आहे.

‘आर्थिक व्यवहारांच्या रचनेतील पुढील टप्पा म्हणून मध्यवर्ती बँकेकडून विकसित करण्यात येणार्‍या डिजिटल करन्सीमुळे व्यवहारांमधील अचूकता वाढेल. ही करन्सी सर्व घटकांना सामावून घेणारी तसेच अर्थव्यवस्थेतील डिजिटल मोहिमेला अधिक वेग देणारी असेल’, असा दावा सिंगापूरच्या मध्यवर्ती बँकेने केला आहे.

दोन वर्षांपूर्वी फेसबुक, ऍमेझॉन, जेपी मॉर्गन यासारख्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून ‘डिजिटल करन्सी’संदर्भात घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला चीन, जपान, ब्रिटन व युरोपिय महासंघासह आखाती तसेच आशियाई देशही डिजिटल करन्सीसाठी हालचाली करीत असल्याचे समोर आले होते. चीनकडून २०१४ सालापासून ‘डिजिटल युआन’चा चलन म्हणून वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरात चीनने प्रायोगिक पातळीवर विविध शहरांमध्ये त्याचा वापर करण्याची मोहीमही राबविली होती. काही महिन्यांपूर्वी चीनने ‘युएई’ व थायलंड यासारख्या देशांबरोबरही डिजिटल करन्सीच्या वापराबाबत बोलणी सुरू केल्याचे समोर आले होते.

leave a reply