चिनी लष्करातील जवान मानसिकदृष्ट्या खचलेले

- जपानच्या आघाडीच्या दैनिकाचा दावा

मानसिकदृष्ट्या खचलेलेटोकिओ/बीजिंग – जगातील सर्वात मोठे लष्कर असे बिरुद मिरविणार्‍या चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे मनोधैर्य खचलेले असल्याचा दावा जपानच्या आघाडीच्या दैनिकाने केला आहे. चीनमधील ‘वन चाईल्ड पॉलिसी’ आणि चिनी समाजातील सामाजिक व सांस्कृतिक घटक यासाठी कारणीभूत असल्याचे ‘निक्केई’ या जपानी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे. जवानांचे खचलेले मनोधैर्य युद्धात घातक ठरु शकते, याची जाणीव झालेल्या चिनी सत्ताधार्‍यांनी क्षेपणास्त्रे व ड्रोन्सवर अधिक भर देण्यास सुरुवात केली, याकडे सदर दैनिकाने लक्ष वेधले आहे.

चीनच्या सत्ताधारी राजवटीने गेल्या वर्षभरात घेतलेल्या दोन निर्णयांचा उल्लेख जपानच्या दैनिकाने केला आहे. यातील पहिला निर्णय, चीनच्या अंतर्गत वाळवंटी भागात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसाठी यंत्रणा उभारण्याचा आहे. तर दुसरा निर्णय मुलांच्या जन्मावरील नियंत्रण उठवून त्यांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त अर्थसहाय्य पुरविण्याचा आहे. चीनने ‘साऊथ चायना सी’मध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी सुविधांची उभारणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात संघर्ष झाला तर या सर्व सुविधांचे रक्षण करता येईल, याची खात्री चिनी सत्ताधार्‍यांना नाही.

तीन वर्षांपूर्वी जपानच्या सेंकाकू आयलंडनजिकच्या भागात एका चिनी पाणबुडीने अचानक आपला ध्वज दाखवून पाण्यावर येण्याचा निर्णय घेतला होता. यामागे जपानी नौदलाकडून आपण लक्ष्य होऊ ही भीती होती, असा दावा जपानच्या दैनिकाने केला. जपान तसेच अमेरिकेतील अनेक अधिकारी ही घटना म्हणजे चिनी जवानांचे मानसिक धैर्य खचल्याचे स्पष्ट उदाहरण असल्याचा दावा करतात, असे ‘निक्केई’ने लेखात सांगितले आहे. चीनने विमानवाहू युद्धनौकांसाठी आक्रमक पावले उचलली असली तरी युद्धादरम्यान या युद्धनौका आपला तळ सोडून बाहेर पडतील, याची खात्री नसल्याचा टोलाही लेखात लगावण्यात आला आहे.

चिनी संरक्षणदलांचा उल्लेख जगातील सर्वात मोठ ‘वन चाईल्ड आर्मी’ असा करण्यात आला असून, ७० टक्क्यांहून अधिक जवान कुटुंबातील एकमेव मूल असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यामागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची ‘वन चाईल्ड पॉलिसी’च कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी चिनी समाजात अपत्याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची हा समज दृढ असल्याने चिनी जवान मृत्यूला घाबरतात, असा दावा जपानी दैनिकाने केला आहे.

चिनी समाजात लष्करातील जवान या पदाला फारशी प्रतिष्ठा नसल्याचेही लेखात सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात चीनला आपल्या संरक्षणदलांसाठी जबरदस्तीने भरती मोहिमा राबवाव्या लागल्या होत्या. तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणेही भाग पडले होते, असाही दावा जपानच्या आघाडीच्या दैनिकाने केला आहे.

लष्करातील जवानांच्या खचलेल्या मनोधैर्यावर उपाय म्हणून चीनने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सुरू केला आहे. लढाऊ विमाने, पाणबुड्या व ड्रोन्सचा वाढता वापर याचाच भाग असल्याचा निष्कर्ष या लेखात मांडण्यात आला आहे. जपानसह इतर देशांनी ही बाब लक्षात घेऊन आपली संरक्षणक्षमता मजबूत करावी, असा सल्ला या लेखाच्या अखेरीस देण्यात आला आहे.

leave a reply