लवकरच चीन जगाचे नेतृत्व करुन पॅलेस्टाईनला समर्थन देईल

- फताह पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा दावा

फताहरामल्ला – ‘चीनचा उदय होत असून लवकरच चीन जगाचे नेतृत्व करील. पॅलेस्टिनी जनता आपल्या स्वतंत्र राष्ट्राबाबत जी काही भूमिका स्वीकारेल, त्याला चीन समर्थन देईल’, असा विश्‍वास वेस्ट बँकमधील फताह पक्षाचे नेते अब्बास झाकी यांनी केला. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये महमूद अब्बास यांच्या फताह पक्षाचे प्रशासन आहे. तर गाझापट्टीत हमास या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फताह पक्ष हा अधिक उदार गट मानला जातो. इस्रायलबरोबरचा द्विराष्ट्रवादाचा मुद्दा चर्चेने सोडविण्यास तयार असल्याचे धोरण अब्बास यांनी स्वीकारले आहे. काही दिवसांपूर्वी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल अल-सिसी यांच्याबरोबर झालेल्या भेटीतही अब्बास यांनी इस्रायलसह चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

पण अब्बास यांच्याच पक्षाच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य असलेल्या झाकी यांनी गेल्या आठवड्यात पॅलेस्टिनी वृत्तवाहिनीशी बोलताना इस्रायलविरोधात गरळ ओकली. ‘सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये काही गंभीर बदल होत आहेत, हे नक्की. पण जगात उदयास येत असलेली महासत्ता चीन, ही तुमच्या बाजूने आहे, हे विसरू नका. लवकरच चीन या जगाचे नेतृत्व करील’, असा दावा झाकी यांनी केला. त्याचबरोबर पॅलेस्टाईनबाबत चीनच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेची आठवण झाकी यांनी करुन दिली.

‘चीननेच जाहीर केल्यानुसार, पॅलेस्टाईनचे स्वातंत्र्य व पूर्व जेरूसलेमला पॅलेस्टाईनची राजधानी घोषित केल्याशिवाय या क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे पॅलेस्टिनी जे काही सांगतील, त्याला चीनचा पूर्ण पाठिंबा असेल. याचा अर्थ, उद्या जर पॅलेस्टिनींनी जॉर्डनच्या नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंतचे क्षेत्र आपलेच असल्याचा हट्ट केला, तर त्यालाही चीन मान्यता देईल. पण आम्ही अशी आत्मघाती मागणी करणार नाही, हे त्यांनाही ठाऊक आहे. म्हणूनच इस्रायलला विषाचा प्रत्येक घोट घ्यायला फताहभाग पाडण्याची तयारी पॅलेस्टिनींनी सुरू करावी’, असे चिथावणखोर विधान झाकी यांनी केले.

यानंतर फताह नेते झाकी यांनी इस्रायलवर ताशेरे ओढत असताना अमेरिकेलाही धमकावले. ‘आपले लष्कर स्वसंरक्षणात्मक असून आपल्या देशाची लोकशाही म्हणजे वाळवंटातील सुखद हिरवळीसारखी आहे, असा इस्रायलचा दावा आहे. पण हा इस्रायलचा दुष्टपणा असून इस्रायली जनता दुष्ट, वर्णद्वेषी आणि खूनी आहे. याउलट पॅलेस्टिनीच अधिक दडपशाहीचा शिकार झालेले आहेत. पॅलेस्टिनी शांतीचे आणि इस्रायली अस्थैर्याचे दूत आहेत, हे लवकरच जगाला कळेल. अमेरिकेने देखील आपल्या भूमिकेत बदल करावा अथवा ते देखील एकटे पडतील’, असा इशारा फताह पक्षाचे नेते झाकी यांनी दिला.

दरम्यान, पॅलेस्टिनी नेत्याच्या या चिथावणीकडे इस्रायलने दुर्लक्ष केले आहे. याउलट अरब देशांच्या साथीने पॅलेस्टाईनचा वाद सोडविण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. गेल्या महिन्याभरात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी व जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्याबरोबरच्या भेटीत यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

leave a reply