अझरबैजान-आर्मेनियाच्या सीमेवर पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली

येरेवन/तेहरान – नागोर्नो-काराबाखच्या वादावरुन अझरबैजान आणि आर्मेनियात छुपे युद्ध अजूनही सुरू आहे. गुरुवारी आपल्या सीमेत तोफगोळे डागल्याचा आरोप या दोन्ही देशांनी केला आहे. अझरबैजानने रुग्णवाहिकेवर चढविलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाल्याचा आरोप आर्मेनियाने केला. तर आर्मेनियाच्या हल्ल्यात आपला जवान मारला गेल्याचा ठपका अझरबैजानने ठेवला.

अझरबैजान-आर्मेनियाच्या सीमेवर पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली2020 साली अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये 44 दिवसांचा संघर्ष पेटला होता. नागोर्नो-काराबाख या वादग्रस्त भूभागावरुन पेटलेल्या या संघर्षात आर्मेनियाची जबर हानी झाली होती. रशियाने मध्यस्थी करुन या दोन्ही माजी सोव्हिएत देशांमध्ये संघर्षबंदी घडविली. पण गेल्या तीन वर्षांपासून या मध्य आशियाई देशांमध्ये सीमावादावरुन सुरू झालेला संघर्ष थांबलेला नाही. नागोर्नो-काराबाखचा वाद सोडवावा, अशी मागणी आर्मेनियाकडून केली जात आहे.

नागोर्नो-काराबाखच्या वादावर चर्चा करण्यासाठी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पॅश्नीयन येत्या रविवारी ब्रुसेल्सला जाणार आहेत. तिथेच पंतप्रधान निकोल आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव यांची भेट घेतील. यावेळी या दोन्ही मध्य आशियाई देशांमध्ये संघर्षबंदीचा करार होण्याची शक्यता वर्तविली जाते.

या संघर्षात आर्मेनियाची बाजू घेणाऱ्या इराणबरोबरही अझरबैजानचे संबंध देखील फिस्कटले आहेत. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव यांनी इराणबरोबरील संबंध आधी कधीही नव्हते, एवढ्या प्रमाणात बिघडल्याची कबुली दिली. इराण अझरबैजानच्या सीमेवर दहशतवाद्यांची तैनाती करीत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांनी केला होता. तर अझरबैजानचे जवान सीमेवर तैनात इराणच्या जवानांना चिथावणी देत असल्याचा ठपका इराणने ठेवला आहे.

दरम्यान, अझरबैजान आणि इस्रायलमधील वाढती मैत्री इराणची डोकेदुखी ठरत आहे. इस्रायलने अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविल्याचा दावा केला जातो. काही दिवसांपूर्वीच इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी अझरबैजानचा दौरा केला होता. यावेळी ड्रोन्स व क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबत अझरबैजानने इस्रायलशी करार केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इस्रायली परराष्ट्रमंत्र्याच्या या दौऱ्यावर इराणने आक्षेप नोंदविला होता. इस्रायल अझरबैजानचा वापर करुन इराणवर हल्ला चढवू शकतो, असा आरोप इराणने केला होता.

हिंदी English

 

leave a reply