लॉकडाऊन काळात रेल्वेच्या विशेष गाड्या

नवी दिल्ली – लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद असलेली रेल्वेची प्रवासी सेवा मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने जाहीर केला. सुरुवातीला नवी दिल्लीहून देशातल्या १५ रेल्वे मार्गावर ही सेवा सुरू होईल. या रेल्वेमुळे दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याचा लाभ मिळेल. या पंधरा मार्गावरील आरक्षणाला सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरुवात झाली. मात्र काही काळातच ‘आयआरसीटीसी’ची वेबसाईट ठप्प झाली.

देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपायला आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. अशावेळी रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी ट्रेन सेवा सुरु करण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. मंगळवारपासून अप ॲण्ड डाऊन मिळून ३० प्रवासी रेल्वे फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल, नवी दिल्ली ते दिब्रुगढ, नवी दिल्ली ते आगरतळा, नवी दिल्ली ते हावडा, नवी दिल्ली ते पटना, नवी दिल्ली ते रांची, नवी दिल्ली ते बिलासपूर, नवी दिल्ली ते भुवनेश्वर, नवी दिल्ली ते सिकंदराबाद, नवी दिल्ली ते बंगळूरू, नवी दिल्ली ते चेन्नई, नवी दिल्ली ते थिरूवनंतपुरम, नवी दिल्ली ते मडगाव, नवी दिल्ली ते अहमदाबाद आणि नवी दिल्ली ते जम्मू तावी या मार्गावर रेल्वे धावतील. याशिवाय मजुरांसाठी सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेगाड्याची सेवाही सुरु असणार आहे.

या सर्व रेल्वे पूर्ण वातानुकूलित असणार आहेत. कोरोनाव्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाड्यांमध्ये पॅन्ट्रीकारची सोय ठेवलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या खानपानाची व्यवस्था करावी लागणार आहे. या रेल्वेच्या प्रवासभाड्यात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वेची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आणखी काही नवीन मार्गावर इतर रेल्वे सुरु केल्या जातील.

रेल्वे प्रशासनने प्रवाशांसाठी काही नियम जाहीर केले आहेत. या विशेष रेल्वेसाठी केवळ ऑनलाइन तिकीट नोंदणी करता येईल. रेल्वे स्थानकांतील आरक्षण सुविधा व तिकीट खिडक्या बंदच राहतील. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. या प्रवाशांची स्थानकात प्राथमिक तपासणी करण्यात येईल. तिकीटावर दिलेल्या सूचनांचे प्रवाशांना पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांना मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाला परवानगी देण्यात येईल. प्रवासात ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप अनिवार्य करण्यात आले आहे.

leave a reply