भारताच्या आक्षेपानंतरही श्रीलंकेने चिनी नौदलाच्या जहाजाला परवानगी दिली

चिनी नौदलाच्याकोलंबो – सुरक्षेच्या संदर्भातील संवेदनशील माहिती टिपण्याची क्षमता असलेल्या चिनी नौदलाच्या ‘युआन वँग ५’ जहाजाला आपल्या बंदराला भेट देण्याची परवानगी श्रीलंकेने दिली आहे. भारताने नोंदविलेल्या आक्षेपानंतरही, चीनचे हे जहाज १६ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरावर दाखल होईल. यासंदर्भात भारताच्या आक्षेपांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगून श्रीलंकेच्या सरकारने आपला हा निर्णय घोषित केला. यामुळे अजूनही श्रीलंका चीनच्या प्रभावातून मुक्त झालेली नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून भरीव सहाय्य मिळाल्यानंतरही श्रीलंकेने चीनच्या बाजूने जाणारा निर्णय घेतला, ही लक्षवेधी बाब ठरते.

११ ऑगस्ट रोजी ‘युआन वँग ५’ जहाज हंबंटोटा बंदरावर येणार होते. मात्र भारताने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर, श्रीलंकेच्या सरकारने सदर जहाजाचा आपल्या बंदरावरील प्रवेश रोखला होता. यामुळे श्रीलंकेचा भारतावरील प्रभाव अधोरेखित झाल्याचे दावे करण्यात येत होते. चीनने यावर तीव्र नाराजी व्यक्त करून श्रीलंकेबरोबरील आपले सहकार्य दुसऱ्या देशाच्या विरोधात नसल्याचे खुलासे दिले होते. शनिवारी श्रीलंकेच्या सरकारने चीनच्या या जहाजाला आपल्या हंबंटोटा बंदरातील प्रवेशाला परवानगी दिल्याचे जाहीर केले. यासंदर्भातील भारताचा आक्षेप जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही त्याला समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने, हा निर्णय घेतल्याचे श्रीलंकेच्या सरकारने म्हटले आहे. त्याचवेळी या चिनी जहाजाला श्रीलंकेकडून देण्यात आलेल्या सूचना लक्षवेधी ठरत आहेत.

श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने सदर जहाज नेमके कुठेआहे, याची माहिती देणारी यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवण्याची सूचना केली. तसेच श्रीलंकेच्या सागरी हद्दीत असताना कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक संशोधन चीनच्या ‘युआन वँग ५’ला करता येणार नाही, अशी अट देखील श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने घातली आहे. या सूचनांची अंमलबजावणी केली तर चीनला या जहाजाच्या हंबंटोटा भेटीद्वारे अपेक्षित उद्दिष्टे गाठता येणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. तसे झाले तर ती भारतासाठी जमेची बाजू ठरू शकते.

‘युआन वँग ५’कडे सुरक्षेच्या संदर्भातील संवेदनशील माहिती टिपण्याची क्षमता असून चीनचे हे जहाज बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. यामुळे भारतीय नौदलाचे दक्षिणेच्या किनारपट्टीवरील तळ तसेच चंदिपूर येथील इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र धोक्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. म्हणूनच भारताने या चिनी जहाजाच्या श्रीलंका भेटीवर आक्षेप नोंदविला होता. यासंदर्भातील घडामोडींकडे भारताचे लक्ष आहे व आपल्या सुरक्षेसाठी भारत योग्य ती खबरदारी घेईल, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयने पुन्हा एकदा नोंदविली आहे. त्याचवेळी अमेरिकेसारखा देश देखील हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या या कारवाया गंभीरपणे घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply