अमेरिका, कॅनडा, ब्रिटनसह युरोपिय महासंघाचे बेलारुसवर कठोर निर्बंध – वरिष्ठ नेते, अधिकारी व कंपन्यांची मालमत्ता गोठविली

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स/मिन्स्क – बेलारुसमध्ये विमान अपहरण करून रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला झालेल्या अटकेच्या मुद्यावर पाश्‍चात्य देशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व युरोपिय महासंघाने संयुक्त निवेदन जारी करून बेलारुसवर कठोर निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले. या निर्बंधांमध्ये बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मुलासह वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच कंपन्यांचा समावेश आहे. नव्या निर्बंधांमुळे बेलारुसच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसेल, असा दावा युरोपिय महासंघाने केला आहे.

कठोर निर्बंधगेल्या महिन्यात, ग्रीसमधून लिथुआनियासाठी निघालेले ‘रायनएअर’ कंपनीचे विमान हायजॅक करून जबरदस्तीने बेलारुसच्या मिन्स्क विमानतळावर उतरविण्यात आले होते. विमानातून प्रवास करणार्‍या रोमन प्रोटासेविक या पत्रकाराला तसेच त्यांची सहकारी सोफिआ सॅपेगालाही बेलारुसच्या यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. रोमन प्रोटासेविकला नंतर थेट तुरुंगात धाडून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाबही घेण्यात आल्याचे समोर आले आहे. विरोध करणार्‍या पत्रकाराला ताब्यात घेण्यासाठी विमानाच अपहरण करण्याच्या या घटनेवर पाश्‍चात्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

या घटनेनंतर युरोपिय महासंघाने आक्रमक भूमिका घेऊन ‘फ्लाईट बॅन’सह गुंतवणूक रोखण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी आपली हटवादी भूमिका कायम ठेवून या कारवाईचे समर्थन केले होते. त्याचवेळी बेलारुसवर होणार्‍या कारवाईला तोंड देण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेऊन सहाय्याचे आवाहन केले होते. रशियाने दिलेल्या आश्‍वासनानंतर बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा आक्रमक वक्तव्ये केली होती.

कठोर निर्बंधबेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी माघार घेण्यास नकार दिल्याने पाश्‍चात्य देशांनी संघटीतरित्या मोठ्या कारवाईचा निर्णय घेतला. ‘लुकाशेन्को राजवटीकडून सातत्याने मानवाधिकार, मूलभूत स्वातंत्र्य व आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडविले जात असून, याबाबत आम्हाला तीव्र चिंता वाटते. बेलारुसच्या राजवटीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या वचनांचे सर्रास उल्लंघन सुरू असून त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल. या मुद्यावर आम्ही एकजुटीने प्रत्युत्तर देऊ’, अशा शब्दात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व युरोपिय महासंघाने संयुक्त निवेदन जारी केले आहे.

अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांचे निकटवर्तिय असणार्‍या १६ नेते व अधिकार्‍यांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले असून पाच कंपन्यांच्या मालमत्ता गोठविल्या आहेत. युरोपिय महासंघाने बेलारुसच्या ७८ नेते व अधिकार्‍यांसह आठ कंपन्यांच्या मालमत्तांवर निर्बंध लादले आहेत. ब्रिटनने बेलारुसच्या इंधनकंपनीसह दोन कंपन्या व ११ जणांवर निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले. तर कॅनडाने १७ अधिकारी व पाच कंपन्यांवर निर्बंध टाकल्याची माहिती दिली आहे. या निर्बंधांनंतर बेलारुसकडून आयात करण्यात येणार्‍या प्रमुख उत्पादनांवरही निर्बंध टाकण्याचे संकेत युरोपिय महासंघाने दिले आहेत.

leave a reply