एलआयसीच्या ‘आयपीओ’ला जबरदस्त प्रतिसाद

- पहिल्याच दिवशी 67 टक्के आयपीओ सबस्क्राईब

मुंबई – बहुप्रतिक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) इनिशयल पब्लिक ऑफरींग (आयपीओ) अखेर बाजारात आला आहे. एलआयसीसारख्या मजबूत सरकारी कंपनीचे शेअर खरेदी करता यावे यासाठी गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून या आयपीओची वाट पाहत होते. त्यामुळे आयपीओअंतर्गत प्रायमरी मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअर खरेदीची संधी मिळताच गुंतवणूकदारांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी एलआयसीने प्रायमरी शेअर बाजारात आणलेल्या शेअरपैकी 67 टक्के शेअर्स सबस्क्राईब झाले. तर या आयपीओमधील एलआयसीच्या ग्राहकांना देण्यात आलेल्या कोट्यापेक्षा दोन पट अधिक बोली आल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोटाही भरला गेला आहे.

आयपीओएलआयसीचा आयपीओ हा भारतीय बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. यापूर्वी 2010 सालात आलेला कोल इंडियाचा 15,200 कोटी रुपयांचा आयपीओ सर्वात मोठा आयपीओ मानला गेला होता. गेल्यावर्षी आलेला पेटीएमचा आयपीओ 18 हजार कोटी रुपयांचा होता. तर एलआयसीच्या आयपीओचे एकूण मूल्य 21 हजार कोटी रुपये आहे.

एलआयसीने आपले 16.20 कोटी शेअर बाजारात आणले असून प्रमियमसह या शेअरचे मूल्य 949 रुपये प्रति शेअर आहे. प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्सची विक्री करताना एलआयसीने काही कोटा आखून दिला आहे. यामध्ये 15.81 लाख शेअर्स हे एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना खरेदीसाठी आहेत. तर एलआयसीच्या ग्राहकांसाठी 2.21 कोटी शेअर्सचा कोटा आहे.

एलआयसीचा आयपीओ हा 31 मार्च रोजीच आणण्यात येणार होता. मात्र युक्रेन युद्धामुळे बाजारातील खराब स्थिती लक्षात घेऊन आयपीओची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. बुधवारी 4 मे पासून एलआयसीचा आयपीओ बाजारात आला. या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 16.20 कोटींपैकी 10.44 कोटी शेअर्ससाठी बोली लागल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा कोटा पूर्ण झाला असून एलआयसी ग्राहकांसाठी आखून दिलेल्या कोट्याच्या दोन पट अधिक अर्ज आले आहेत. किरकोळ ग्राहकांसाठी असलेल्या कोट्याच्या 57 टक्के बोली आल्या आहेत. रिटेल अर्थात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 31.25 टक्के कोटा आहे.

leave a reply