युक्रेनसह पाश्चिमात्यांविरोधातील संघर्ष ही रशियाच्या अस्तित्त्वाची लढाई

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – युक्रेनसह पाश्चिमात्यांविरोधात सध्या सुरू असणारा संघर्ष ही रशियासाठी अस्तित्त्वाची लढाई आहे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले. रशियाचे शत्रू गेल्या अनेक वर्षांपासून रशियाला अस्थिर करून त्याचे तुकडे पाडण्याचे मनसुबे रचत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी रशियन जनतेने एकजूट दाखविणे गरजेचे आहे, असे आवाहनही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केले. दरम्यान, अमेरिकेतील आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांनी युक्रेन पराभूत होण्याचे संकेत मिळाल्यास अमेरिका थेट रशियाविरोधातील युद्धात उतरेल, असा दावा केला आहे.

युक्रेनसह पाश्चिमात्यांविरोधातील संघर्ष ही रशियाच्या अस्तित्त्वाची लढाई - राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मंगळवारी एका संरक्षणनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर आपली भूमिका मांडली. ‘रशियाचे शत्रू असलेले पाश्चिमात्य देश त्यांचे भूराजकीय धोरण सुधारण्यासाठी रशिया-युक्रेन युद्धाचा वापर करीत आहेत. मात्र रशियासाठी परिस्थिती वेगळी आहे. रशिया भूराजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संघर्षात उतरलेला नाही. युक्रेन व युक्रेनसह पाश्चिमात्यांविरोधात सुरू असलेला संघर्ष ही रशियाच्या अस्तित्त्वासाठी चाललेली लढाई आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले.

रशियाने गेली अनेक दशके युक्रेनबरोबरील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले पण २०१४ साली पाश्चिमात्यांनी घडविलेल्या बंडानंतर परिस्थिती बदलली, असा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला. यावेळी त्यांनी पाश्चिमात्यांकडून रशियावर टाकण्यात आलेल्या निर्बंधांवरही टीका केली. ‘निर्बंध टाकल्यावर दोनतीन आठवड्यांमध्ये किंवा महिन्याभरात रशिया कोसळेल, असा पाश्चिमात्यांचा अंदाज होता. भागीदार देशांनी सहकार्य बंद केल्याने रशियन उद्योग बंद पडतील, अशी त्यांची अपेक्षा होती. अर्थव्यवस्था कोसळेल, हजारो नागरिक बेरोजगार होतील, रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि रशियन राजवटीला आतून हादरे बसून ती कोसळेल, असे पाश्चिमात्यांना वाटत होते. तोच त्यांचा उद्देश होता, पण तसे झाले नाही. उलट रशियन अर्थव्यवस्था अधिक मजबूत, स्वतंत्र व सार्वभौम झाली’, याकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, अमेरिकेतील पत्रकार सेमूर हर्श यांनी अमेरिका रशियाविरोधात थेट युद्धात उतरू शकते, असा दावा केला. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी युक्रेनी लष्कराच्या पराभवाबाबत बोलताना हे वक्तव्य केले. युक्रेनी लष्कर पिछाडीवर पडण्याचे संकेत मिळाले तर अमेरिका नाटोचा आधार घेऊन युद्धात उतरेल, असे हर्श यांनी म्हटले आहे. अमेरिकेने युरोपात पाठविलेले लष्कर व शस्त्रसाठा याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

हिंदी English

 

leave a reply