‘आयएनएस विक्रांत’वर तेजसचे यशस्वी लँडिंग

Tejas on INS Vikrantनवी दिल्ली – देशातच उभारणी करण्यात आलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेवर सोमवारी देशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानाने यशस्वी लँडिंग पार पाडले. देशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेवर स्वदेशी लढाऊ विमानाचे लँडिंग हा संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या आघाडीवरील ऐतिहासिक टप्पा ठरतो, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्यात ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात सहभागी झाली. यामुळे विमानवाहू युद्धनौका विकसित करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या देशांच्या श्रेणीत भारताचा समावेश झाला. ‘आयएनएस विक्रांत’ म्हणजे नौदलाचा तरंगता तळ असल्याचे बोलले जाते. मात्र या युद्धनौकेवर तैनात करण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांसाठी भारत फ्रान्सकडून रफायल विमानांची खरेदी करण्याचा विचार करीत आहे. याबरोबरच या युद्धनौकेच्या सहभागामुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या युद्धनौकेमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने नौदल अधिकच सक्षम झाले आहे.

Successful landing of Tejasसोमवारी या स्वदेशी युद्धनौकेवर हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरते, असे नौदलातर्फे सांगण्यात आले. ‘तेजस’ हे लढाऊ विमान भारतीय संरक्षणदलांसाठी निर्णायक टप्पा मानला जातो. सुरुवातीला केवळ हवाईदलासाठी तयार करण्यात आलेली आवृत्ती यशस्वी झाल्यानंतर भारतीय नौदलानेही तेजसची मागणी केली होती. भारतीय यंत्रणांनी यशस्वीरित्या नौदल आवृत्ती विकसित करून नौदलाची मागणी पूर्ण केली होती.

नौदलात समावेश केलेल्या दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेमुळे देशाच्या सागरी हितसंबंधांची सुरक्षा करणे सोपे जाईल. चीन आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नव्या युद्धनौका, पाणबुड्यांची उभारणी चीनकडून केली जात आहे. यासह संरक्षणदलाच्या खर्चात देखील चीनने वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांतचा समावेश लक्षणीय बाब ठरते. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारतीय नौदलाचा प्रभाव अधिकच वाढेल. तसेच हिंदी महासागर क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याचे चीनचे स्वप्न या आयएनएस विक्रांतमुळे पूर्ण होऊ शकणार नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

दरम्यान, भारतीय नौदल तटवर्ती भागांसह जलवाहतुकीतील व्यापार मार्गांचे रक्षण अत्यंत यशस्वीपणे करीत असल्याचे राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू म्हणाल्या. कोणत्याही संकटात नौदल सहाय्य करण्यासाठी पुढे येते. भारतीय नौदल साहित्य व्यवस्थापन सेवेचा भाग असल्याने या अधिकाऱ्यांवर नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांना आवश्यक साहित्य सामुग्री पोहोचवण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतीय नौदलाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींनी नौदलाची प्रशंसा केली.

leave a reply