विनाशिकाभेदी सुपरसोनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली – भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ने (डीआरडीओ) ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या वेगवेगळ्या आवृत्तींच्या चाचणीचा धडाका लावला आहे. मंगळवारी अंदमान-निकोबार द्वीपसमुहाच्या सागरी क्षेत्रातून सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. ‘आयएनएस रणविजय’ या युद्धनौकेवरुन प्रक्षेपित केलेल्या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरातील आपले लक्ष्य अचूकरित्या भेदले. आठवड्यापूर्वी ‘डीआरडीओ’ने याच द्वीपसमुहावरुन ब्रह्मोसच्या लष्करी आवृत्तीची चाचणी करण्यात आली होती.

विनाशिकाभेदी

मंगळवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटाच्या सुमारास ब्रह्मोस प्रक्षेपित करण्यात आले. सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या या सुपरसोनिक क्रूझ् क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात तैनात असलेल्या विनाशिकेला जलसमाधी दिली. गेल्या महिन्याभरात भारतीय नौदलाने ब्रह्मोसच्या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्राची घेतलेली ही दुसरी चाचणी ठरते. याआधी अरबी समुद्रात विनाशिकाभेदी ब्रह्मोसच्या प्रगत आवृत्तीची चाचणी केली होती.

लडाखच्या ‘एलएसी’वर चीनबरोबरील वाढता तणाव व नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कुरापतींच्या पार्श्‍वभूमीवर, भारताने आपल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा धडाका लावला आहे. अंदमान-निकोबार बेटावरुन ब्रह्मोसच्या तीन चाचण्या आयोजित केल्या असून यापैकी लष्करी व नौदलाच्या आवृत्तीची चाचणी पार पडली आहे. पुढच्या आठवड्याभरात वायुसेनेच्या आवृत्तीची चाचणी पार पडणार आहे.

leave a reply