सुदानमधील गृहयुद्धातील बळींची संख्या २७०वर

संघर्षबंदीनंतरही रुग्णालयांवर हवाई हल्ले
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नव्या संघर्षबंदीचे आवाहन

SUDAN TALE OF TWO GENERALSखार्तूम – अमेरिकेने सुदानमधील गटांसाठी प्रस्तावित केलेली २४ तासांची संघर्षबंदी लागू होण्याआधीच त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. सुदानमधील गृहयुद्धात २७० जणांचा बळी गेला असून २६०० जण जखमी आहेत. पण सलग सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे ढिगाऱ्याखाली तसेच रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांची गणती यात केलेली नाही. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते. लष्कर आणि निमलष्करीदल एकमेकांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवित असून रुग्णालयांना देखील या हल्ल्यांचे लक्ष्य केले जात आहे. यामुळे नितांत आवश्यकता असताना सुदानमधील ५० टक्के रुग्णालये व दवाखाने बंद आहेत. त्यातच जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स कमी पडत आहे. त्यामुळे सुदानमधील जीवितहानी भयावहरित्या वाढण्याची चिंता व्यक्त केली जाते.

१५ एप्रिल रोजी सुदानच्या लष्कर आणि निमलष्करीदलात भडकलेला संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेने मध्यस्थी घडवून दोन्ही गटांना संघर्षबंदीसाठी तयार केले होते. या काळात सुदानमध्ये मानवतावादी सहाय्य पोहोचविणे तसेच परदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण २४ तासांची संघर्षबंदी एका तासासाठी देखील लागू होऊ शकली नाही. सुदानच्या लष्कराची लढाऊ विमाने निमलष्करीदलाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवित असल्याचे व्हिडिओज्‌‍ समोर आले आहेत.

Sudan unrestनिमलष्करीदल देखील हेलिकॉप्टर्सचा वापर करून लष्कराच्या ताब्यातील ठिकाणांवर हल्ले चढवित आहेत. या दोन्ही हल्ल्यांमध्ये लष्करी तळांबरोबरच नागरी वसाहती, रुग्णालये देखील लक्ष्य केली जात आहेत. लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करदलप्रमुख जनल दागालो माघार घ्यायला अजिबात तयार नाही. सुदानच्या लष्कराने राजधानी खार्तूमसह बहुतांश भागावर पूर्णपणे ताबा मिळविल्याचा दावा माजी नौदल अधिकारी करीत आहेत. सुदानमधील दोन भागच फक्त निमलष्करीदलाच्या ताब्यात आहेत, असे या निवृत्त नौदल अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर निमलष्करीदलाच्या २० हजार जवानांनी लष्करासमोर शरणांगती पत्करल्याच्या बातम्या येत आहेत.

जनरल दागालो या सर्व बातम्या फेटाळून लावत आहेत. लष्कराविरोधातील हा संघर्ष सुदानच्या जनतेसाठी असून या संघर्षात आपलाच विजय होईल, असा दावा जनरल दागालो करीत आहेत. पण लष्करप्रमुख जनरल बुरहान पुढील दोन वर्षात देशात लोकशाहीवादी व्यवस्था प्रस्थापित करणार होते व त्याला जनरल दागालो यांनीच विरोध केला होता, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे दोन अहंकारी जनरल्सची किंमत सुदानची जनता चुकवीत असल्याची टीका सुदानच्या जनतेमध्ये जोर पकडत आहे.

सुदानमधील या गृहयुद्धासाठी दोन शेजारी देश जबाबदार असल्याचा आरोप लष्कर करीत आहेत. शेजारी आफ्रिकी देशांनी निमलष्करीदलाला शस्त्रास्त्रे पुरविल्याचा ठपका लष्कराने ठेवला आहे. सुदानच्या लष्कराने थेट उल्लेख केला नसला तरी चाड आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांवर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सुदानमधील हा संघर्ष थांबवून नव्याने संघर्षबंदी लागू करण्यात यावी, असे आवाहन अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी तसेच इतर युरोपिय देशांसह कॅनडा, दक्षिण कोरिया यांनी केले आहे. तर भारताने सौदी अरेबिया, युएई या अरब मित्रदेशांबरोबर चर्चा करुन सुदानमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदानमध्ये किमान १८०० ते २५०० भारतीय असल्याचा दावा केला जातो.

leave a reply