प्रक्षोभक निदर्शनांना परवानगी देणाऱ्या स्वीडनचा तुर्कीकडून जोरदार निषेध

निदर्शनांना परवानगीअंकारा/स्टॉकहोम – स्वीडनच्या नाटोमधील प्रवेशावरून सुरू असलेला स्वीडन व तुर्कीचा वाद विकोपाला गेला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये तुर्कीविरोधी निदर्शनांना परवानगी देऊन निदर्शकांना इस्लामधर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ पेटविण्याची परवानगी स्वीडनच्या यंत्रणांनी दिली होती. त्याच्या विरोधात तुर्कीची जहाल प्रतिक्रिया उमटली असून तुर्कीने या प्रकरणी स्वीडनच्या राजदूतांना समन्स बजावले आहे. तसेच स्वीडनच्या संरक्षणमंत्र्यांची तुर्कीची भेटदेखील रद्द करण्यात आलेली आहे.

नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युक्रेनवर रशियाने हल्ला चढविल्यानंतर, युरोपिय देशांनी आपल्या संरक्षणासाठी नाटोत सहभागी होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशा देशांमध्ये स्वीडनचादेखील समावेश आहे. मात्र नाटोचा सदस्यदेश असलेल्या तुर्कीने स्वीडन, फिनलँड या युरोपिय देशांचा नाटोमधील सहभाग रोखून धरलेला आहे. तुर्कीला आपल्या बाजूने वळविण्यात या देशांनी प्रयत्न केले होते, पण त्याला यश मिळू शकलेले नाही. याचा परिणाम स्वीडन व तुर्कीच्या द्विपक्षीय संबंधांवर झाला आहे.

निदर्शनांना परवानगीस्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील निदर्शनांच्या दरम्यान रासमुस पलुदान या उग्रवादी नेत्याने तुर्कीच्या दूतावासाबाहेर इस्लामधर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ पेटवून देऊन निदर्शने करण्याची परवानगी मागितली होती. स्वीडनच्या यंत्रणांनी ही परवानगी दिल्यामुळे तुर्कीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देऊन स्वीडन तुर्कीची दिशाभूल करू शकत नाही, असे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावुसोग्लू यांनी बजावले आहे. तर तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशातील स्वीडनच्या राजदूतांना या प्रकरणी समन्स बजावून राजनैतिक पातळीवर कडक शब्दात निषेध नोंदविला आहे. याबरोबरच स्वीडनच्या संरक्षणमंत्र्यांची तुर्की भेट रद्द करण्याचा निर्णयही तुर्कीच्या सरकारने घेतला आहे. तुर्कीमध्ये स्वीडनच्या विरोधात निदर्शने सुरू झाल्याच्याही बातम्या येत आहेत.

दरम्यान, सिरियातील कुर्दवंशियांकडून आपल्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा करून तुर्की सिरियात घुसून कुर्दवंशियांवर हल्ले चढवीत आहे. तर स्वीडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुर्दवंशियांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत तुर्कीच्या हल्ल्यांविरोधात कुर्दवंशियांनीही शनिवारी स्वीडनच्या राजधानीत स्वतंत्र निदर्शनांचे आयोजन केले होते. त्याची दखल जगभरातील माध्यमांनी घेतलेली आहे. या निदर्शनांना स्वीडनने दिलेली परवानगी देखील तुर्कीच्या संतापात अधिकच भर घालत असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.

leave a reply